सुशिक्षीत बेरोजगारीच्या भविष्याची दुर्दैवी सुरुवात…!!!

काही दिवसांपुर्वी पुण्यातील आयटीत शिकणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली. भविष्याची चिंता वाटते, नोकरी मिळेल याची खात्री नाही त्यामुळे आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी लिहुन या तरुणाने आत्महत्या केली. प्रकरण जास्त चर्चेत आले नाही परंतु या घटनेचे गांभीर्य दुर्लक्षीत करण्यासारखे नाही. आज भारतात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. शिक्षणक्षेत्रात क्रांती झाली खरी पण प्रत्येक सुशिक्षीत तरुणाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली नाही. दुर्दैव म्हणजे आहेत त्या नोकऱ्या धोक्‍यात आल्या आहेत. आज ग्रामीण भागात दर दुसऱ्या घरात बेरोजगार तरुण सापडतील. लक्षावधी रुपये खर्चुन नोकरी नसल्यामुळे भविष्याच्या चिंतेतुन नैराश्‍याचे ओझे डोक्‍यावर घेवुन बेरोजगारीच्या बाजारात फिरणाऱ्या तरुणांपुढे आत्महत्येचा पर्याय येतोय. यासंदर्भात बेरोजगारीच्या जगातल जळजळीत वास्तव रेखाटणारा हा लेखन प्रपंच…

शिक्षणव्यवस्थेचे बाजारीकरण
भारतीय शिक्षण व्यवस्थेचा संपुर्ण जगात दबदबा आहे. जगभरातील लोक शिक्षणासाठी भारतात येतात. पण डोनेशन्स, सरकारी निधीतुन भरमसाठ पैसा मिळवण्याच्या हेतुने अनेक खाजगी शैक्षणीक संकुले राज्यकर्त्यांच्या कृपाशिर्वादेने उभी राहिली आणि भावी पिढीच्या भविष्याशी खेळण्याची सुरुवात या ठिकाणावरुन झाली. ईंजीनिअरींग, एमबीए, रिसर्च ईन्स्टीट्युट्‌स, आयटी अशा विवीध क्षेत्रांमध्ये खाजगी कॉलेजांमुळे दर्जाहीन शिक्षणातुन हजारो अकार्यक्षम युवक तयार झाले. फक्त कागदी डिग्री मिळाली म्हणजे झाले अशा भ्रमात युवापिढी राहिली आणि याचा परीणाम म्हणुन कौशल्य नसलेले युवक प्रचंड स्पर्धेत टिकत नाहीत. शिक्षणक्षेत्रात आतातरी बदल होणे अपेक्षीत आहे.

करीअर ऍकॅडमी, क्‍लासेस आणि अर्थकारण
पोलीस, आर्मी भरतीसाठी ऍकॅडमी लावली जाते. एमपीएससी, युपीएससी साठीही अनेक खाजगी संस्था क्‍लासेस घेतात. कम्प्युटरसाठी क्‍लासेसेस, सीए साठी क्‍लासेस, एमबीए फायनान्सचे क्‍लासेस यातुन सुशिक्षीत तरुणांना रोजगारांच्या संधींपर्यंत पोहचवले जाते. परंतु सध्याचे चित्र पाहता अवाढव्य पैसे खर्चुन प्रत्येकाला यश मिळत नाही.

कन्सलटन्सी, रोजगार मेळाव्यांमधली लुटमार
अनेकदा विविध कंपण्या स्वतः कामगार भरती न करता एखाद्या कन्सलटन्सीमार्फत, अथवा रोजगार मेळाव्यांमधुन कामगार घेतात. यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थकारण दडले आहे. एखाद्या कंपनीला चार-दोन कामगारांची गरज असते त्यासाठी जाहीरात देउन कन्सलटन्सीच्या माध्यमातुन कामगारभरती केली जाते. त्यामध्ये मुलाखतींना आलेल्या उमेदवारांकडुन फी घेतली जाते. होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवुन पैशांची कमाई केली जाते.

खर्चाच्या तुलनेत मिळणारा मोबदला
शिक्षण हे खर्चीक क्षेत्र बनले आहे. पुर्वी शिक्षणासाठी जास्त पैसा लागत नव्हता. आता भरमसाठ फी, शैक्षणीक साहित्य, क्‍लासेस यांमुळे खर्च वाढला आहे. एक इंजीनिअर डिग्री हातात मिळवेपर्यंत कमीत-कमी पाच ते सात लाखांचा खर्च करतो. आणि संपुर्ण शिक्षणाचा खर्च दहा ते बारा लाख. साधारण वय पंचवीशीपर्यंत. आणि जेव्हा तो रोजगाराच्या बाजारात उतरतो तेव्हा मात्र पंधरा ते वीस हजारांची नोकरी मुश्‍कीलीने मिळते. म्हणजे पंचवीस वर्षे खर्चुन दहा लाख घालवुन वीस हजारांची नोकरी.

भविष्य काय..?
बेरोजगारांच्या आत्महत्या ही या भविष्याची दुर्दैवी सुरुवात आहे असे मी मानतो. रोजगाराचा प्रश्‍न येत्या काळात अतिशय गंभीर होईल. दरदिवशी दोनशे नोकऱ्या कमी होत आहेत. प्रत्येक क्षेत्राची स्थिती डीएड. बीएड. सारखी झाली आहे. परराज्यांतुन वाढणारे लोंढे स्थानिक लोकांचे रोजगार हिरावत आहेत. संघटीत कामगारांनाच न्याय मिळत नाही तर असंघटितांचे विचारुच नका. जग वाऱ्याच्या वेगाने पळत आहे. पैसाही सबकुछ है ही मानसिकता बळावली आहे. कित्येक तरुणांची लग्न होत नाहीत. सर्वात जास्त स्पर्धा रोजगारासाठी आहे. शहरीकरण वाढत आहे. भविष्याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे. अजुनही वेळ गेली नाही. स्टार्टअप, मेकईन किंवा कौशल्य विकास प्रत्येक हाताला काम ही गरज पुर्ण व्हायलाच हवी. अन्यथा काळ बिकट आहे. कलेला पर्याय नाही. शिक्षणाबरोबरच काहीतरी कलाही घेणे गरजेचे आहे कारण कलेला मरण नाही. तरुणाईशी संवाद साधलाच पाहीजे. संवाद संपला तर दररोज काहीतरी अघटीत घडेल. परिस्थिती बदलली नाही तर येत्या पाच वर्षांतले वास्तव भयानक असेल हे मात्र नक्की.

– निखिलआण्णा घाडगे

Leave A Reply

Your email address will not be published.