“कासारसाई’च्या “बॅकवॉटर’मध्ये बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

लोणावळा  (वार्ताहर) – मित्रांसोबत कासारसाई धरणावर फिरायला आलेल्या एका युवकाचा धरणाच्या “बॅक वॉटर’मध्ये बुडून दुदैवी मृत्यू झाला. शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर या युवकाचा मृतदेह पाण्याबरोबर काढण्यात यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत कुमार सिंग (वय 34, रा. मूळचा रा. दिल्ली) हा बुधवार (दि. 23) आपल्या मित्रांसोबत पाचाणे-पुसाने यथे कासार साई धरणाच्या “बॅक वॉटर’जवळ रात्री फिरायला गेला असता पाण्यात बुडाला. गुरुवारी सकाळी लोणावळ्यातील शिवदुर्गला मित्र बचाव पथकाला यासंदर्भात फोन आला. बचावपथक घटनास्थळी पोहचल्यानंतर शिवदुर्गच्या पथकाने पाण्यात शोधकार्य सुरू केले. मात्र पाण्याला प्रवाह होता, शिवाय पाण्याचा पसराही खूप होता. हेमंतकुमार याचा मित्रांनी सांगितलेल्या ठिकाणी शोध घेतला; परंतु अंधार पडल्याने शिवदुर्गला शोधकार्य थांबवले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. 25) सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास हेमंतकुमार याचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्गच्या बचाव पथकाला यश आले.

या शोध कार्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व फायर ब्रिगेड मारुंजे, आय.एन.एस. शिवाजी लोणावळा यांच्या टीमही आल्या होत्या. शिवदुर्ग बचाव पथकात सुनील गायकवाड, राजेंद्र कडू, आनंद गावडे, महेश मसणे, अभिजित बोरकर, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, शुभम आंद्रे, करण आंद्रे, रुपेश गराडे, शेखर गराडे, बाळासाहेब गराडे व भास्कर साबळे यांनी सहभाग घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.