देशात महिलांची बेरोजगारी पुरूषांच्या प्रमाणापेक्षा दुपटीहून जास्त

नवी दिल्ली : भारतात महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत दुपटीहून जास्त असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. महिलांची शैक्षणिक पात्रता पुरूषांच्या बरोबरीची असूनही बेरोजगारीमध्ये महिलांचे प्रमाण दुपटीहून अधिक आहे, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

जेंडर इनक्‍लुजन इन हायरिंग इन इंडिया या शीर्षकाखाली हार्वर्डचे विद्यार्थी राशेल लेव्हेनसन व लायला ओकेन यांनी संशोधन निबंध सादर केला असून त्यात म्हटले आहे, की देशात 8.7 टक्के सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत, तुलनेने चार टक्के पुरुषांना नोकऱ्या नाहीत. महिलांचा निर्णय व त्यांची नोकरी शोधण्याची क्षमता यावर परिणाम करणारे घटक वेगळे असतात. लिंगभेदामुळे उच्च शिक्षित स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नोकऱ्या मिळण्यास कठीण जाते. भारतातील 200 प्रकारच्या नोकऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली, त्यात 2016-2017 दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भरतीचे स्वरूप त्यातून स्पष्ट झाले. 21104 उमेदवारांनी वेगवेगळ्या कामांसाठी एकूण 286991 अर्ज केले होते. कर्मचारी भरती व्यवस्थापक व कर्मचारी बाजारपेठ तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता असे दिसून आले की, अजूनही नोकरी देताना भारतात लिंगभेदाचा परिणाम होत आहे. पात्रता व अनुभव, पर्याय, अर्ज प्रक्रिया यात महिलांना अडचणी आल्याचे दिसून आले. जर भारतातील नोकऱ्यांत महिलांना योग्य स्थान मिळाले तर देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हे 27 टक्के वाढू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)