मिळकतीचा अनधिकृत ताबा घेणारे अटकेत

पाचगणी येथील घटना 12 जणांवर गुन्हा, चौघे मोकाटच

पाचगणी  – दोन दिवसांपूर्वी पाचगणी तायघाट येथील 545/5 या ठिकाणी असलेल्या बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश केल्या प्रकरणी घुसखोरी व जबरी चोरीचा पूनम कांबळे सह 12 जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली. बेकायदेशीरपणे गुंडगिरीने मिळकतींचा ताबा घेणाऱ्या प्रवृत्तींचा यामुळे धाबे दणाणले असून जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, सपोनि तृप्ती सोनावणे यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक केलेल्या आठ जणांना पांचगणी पोलिसांनी आज महाबळेश्‍वर येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, पाचगणी तायघाट येथे 545/5 ही मिळकत आहे. या मिळकतींवर गेल्या 3 वर्षांपासून विकास शिंदे यांचा ताबा आहे, असे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र या मिळकतीमध्ये भाडेकरू म्हणून मी राहत होतो असा दावा करणाऱ्या इराणी यांचा आणि शिंदे यांच्यात ताब्यावरून वाद सुरू आहे, व तो न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात अनेक बाबी आहेत,न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे. त्यातच शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या मिळकतीमध्ये इराणी यांच्याबरोबरच पूनम कांबळे व त्यांचे 12 साथीदार घुसले आणि त्यांनी सोन्याची चैन, रोख रक्कम हिसकावून घेतल्याची फिर्याद प्रवीण शिंदे यांनी दिली.

या फिर्यादीनंतर या मिळकतीच्या ताब्यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पाचगणी पोलिसांनी अतिशय शिताफीने पूनम कांबळे व सहकऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.अटकेची कारवाई देखील सुरू केली. मात्र या घटनेतील कायदेशीर गुंतागुंतीचा विचार करून सपोनि तृप्ती सोनावणे यांनी एक पाऊल मागे घेत कायदेशीर सल्लामसलत करून या प्रकरणाला वेग दिला.त्यातच अवघ्या महिनाभरपूर्वीच सातारा जिल्हा प्रमुख पदी विराजमान झालेल्या तेजस्विनी सातपुते यांनी असली गुंडागर्दी, दादागिरी चालू देणार नाही असा चंगच बांधला होता. त्यामुळे त्यांनी या आरोपीना कडक शासन होऊन अशा प्रवृतींना कायद्याचा वचक बसावा म्हणून कडक कारवाई करण्याचे संकेत सपोनि तृप्ती सोनावणे यांना दिले.

त्यातूनच या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी शुभम शंकर चोरगे (वय 22, रा. कुलाबा, मुबंई),  अतिष नामदेव बोडके (वय 25, रा.कोपरखैरणी, मुबंई), निलेश गोकुळ गोळे (वय 29), रा. कोपरखैरणी, मुबंई मुळ गाव कासवंड), रफिक मैहबूब इनामदार (वय 28, रा. जत, सांगली), टिपूसुलतान सिंकदर पटवेकर (वय 28, रा. मंचंडी ता. जत), संदीप दयानंद सातपुते (वय 28, रा. जत जि. सांगली), तोहपिक जहांगीर मुल्ला (वय 27, रा.जयसिंगपुर, ता. जत), अविश यशवंत चव्हाण (वय 28, रा. भिमनगर पाचगणी) यांना अटक केली. तेजस्विनी सातपुते यांनी या प्रकरणात कडक कारवाई करण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याने या प्रकरणातील आरोपींना बेड्या पडल्या असून यापुढे असली कृत्य करण्यासाठी संबंधित दहादा विचार करतील असा वचक बसविण्यास सातारा पोलीस सध्या तरी यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. या कारवाई बद्दल सपोनि तृप्ती सोनावणे यांचे देखील पाचगणी परिसरात कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.