महामार्गावर माॅर्निंग वाॅकला जाणं जीवावर बेतलं; दोघांचा वाहनाखाली चिरडून मृत्यू

परभणी – महामार्गावर माॅर्निंग वाॅकसाठी गेलेल्या दोघांचा अज्ञात वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी पहाटे मानवत तालुक्यातील पाथरी-परभणी महामार्गावर असलेल्या केकरजवळा येथे घडली. उत्तम लाडाने, आता्माराम लाडाने अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तम लाडाने, आत्माराम लाडाने, नंदकिशोर लाडाने, राधेश्याम लाडाने हे चौघेजण नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता पाथरी-परभणी महामार्गावर पाथरीकडे मॉर्निंग वॉक करत निघाले होते. गावापासून पुढे काही अंतरावर गेल्यानंतर पाथरी कडून परभणीकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या चारही जणांना चिरडले. घटनेनंतर वाहन चालक पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उत्तम लाडाने आणि आत्माराम लाडाने यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर नंदकिशोर आणि राधेश्याम हे दोखे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वीच असंच पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील चार तरुण पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करत होते. तेही पहाटे 4 वाजता महामार्गावर रनिंग, व्यायाम करत होते. रस्त्याच्या शेजारी व्यायाम करत असताना या चौघांना मुंबईकडून-नांदेडला जाणाऱ्या भरधाव वाहनाने चिरडले होते. ज्यात या भावी पोलिसांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे पहाटे-पहाटे महामार्गांवर मॉर्निंग वॉक, व्यायाम करताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.