पारनेर – पारनेर तालुक्यातील दोघांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दोन दिवसांपूर्वी भाळवणी येथे विनापरवाना आलेल्या कुटुंबातील एका 10 वर्षीय मुलाचा व पुणेवाडी येथील एका 26 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबईहून आलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात करोनाचा प्रसार वाढत असून, ही पारनेरकरांसाठी चिंतेची बाब आहे.
भाळवणी येथे मंगळवारी (दि. 2) मुंबईवरून आलेल्या एका कुटुंबातील सात जणांच्या स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कुटुंबातील दहा वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. इतरांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले. हे कुटुंब विनापरवाना मुंबईहून भाळवणी येथे आले होते. त्यामुळे या कुटुंबातील तीन सदस्यांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच 1 जून रोजी मुंबईहून पती-पत्नी पुणेवाडी येथे आले होते. त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आली होते. त्यानंतर पतीस त्रास होऊ लागल्याने त्याने आपल्या स्त्रावाची तपासणी करावी, अशी मागणी आरोग्य विभागाकडे केली. त्यानुसार आरोग्य विभागाने पती-पत्नीचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये महिला करोनाबाधित आढळली आहे. 32 वर्षीय पतीला मुंबईत असताना सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्याने तेथील आरोग्य विभागाकडे करोना चाचणी करावी, अशी मागणी केली होती. मात्र तेथे चाचणी न केल्याने या दाम्पत्याने गावी येणे पसंत केले.
ते टॅंकरने कारेगाव पर्यंत आले. तेथून आपल्या मेहुण्याच्या वाहनावरून पुणेवाडी येथे आले. गावात आल्यावर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. हे दाम्पत्यही मुंबईहून विना परवाना पुणेवाडीत आल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला बाधित आढळल्याने तिच्या संपर्कात आलेल्या पुणेवाडीतील सहा जणांना व पारनेर येथे राहणाऱ्या तिच्या भावाला आरोग्य विभागाने तातडीने नगर येथे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली.
पोलीस निरिक्षक व सरपंचाची शाब्दिक चकमक
पुणेवाडी येथे आलेले दाम्पत्य विना परवाना आल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पुणेवाडी येथे येऊन चौकशी केली. तसेच सरपंच बाळासाहेब रेपाळे यांना या व्यक्तींना गावात विनापरवाना कसे येऊन दिले, असा जाब विचारला. त्यामुळे या दोघांत चांगलीच शाब्दिक चकमक झाली..
तिघांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
हिवरे कोरडा येथील 46वर्षीय व्यक्ती त्याची 18 वर्षीय मुलगी हे दोघे कोरूना बाधित होते त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे तसेच तालुक्यांमध्ये एकूण कोरोना बाधित संख्या सात असून तिघाजणांना घरी सोडले आहे एकाचा मृत्यू झाला आहे व तीन जणांवर सध्या नगर येथे उपचार सुरू आहेत.