सातारा -राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार असल्याने सातारा पालिकेतील इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे. इच्छुकांना राजकीय पक्ष व आघाड्याच तारणार आहेत.
आमदार व खासदार गटांमध्ये राजकीय युद्ध आतापासूनच गाजू लागले असताना, राष्ट्रवादीची तिसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. भाजप कमळ या अधिकृत चिन्हावर स्वतंत्र निवडणूक लढणार का, हा प्रश्न आहेच. या सर्व शक्याशक्यता पडताळून पाहण्यात येतील.
द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे विद्यमान नगरसेवकांना फारसा फटका बसणार नसला, तरी काहींना आरक्षणाचा फटका बसू शकतो. सातारा पालिकेतील राजकीय घडामोडींकडे अवघ्या राज्याचे लक्ष असते. सध्या पालिकेत खा. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. यंदाही पालिकेचा गड काबीज करण्यासाठी ही आघाडी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. त्यांच्या विरोधकांनीदेखील कंबर कसली आहे.
इच्छुक उमेदवार कितीही सक्षम असो, जनमानसात त्याची प्रतिमा कितीही चांगली असली, तरी राजकीय पक्ष व आघाड्यांशिवाय टिकाव लागणे अवघड आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. सातारा पालिकेच्या विद्यमान नरसेवकांना द्विसदस्यीय पद्धतीचा फारसा फटका बसणार नाही. केवळ प्रभागांमध्ये थोडा फार बदल होऊ शकतो; परंतु आरक्षणाचा फटका विद्यमानांना बसू शकतो.
साताऱ्याची समीकरणे पुन्हा चर्चेत
साताऱ्याचे राजकारण जलमंदिर व सुरूची बंगला या दोन सत्ताकेंद्राभोवती फिरते. द्विसदस्यीय प्रभागांमुळे नव्या दमाचे व निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार देण्याची दोन्ही राजांची तयारी सुरू झाली आहे. हद्दवाढीमुळे आगामी निवडणुकीत पाच नगरसेवक देणाऱ्या शाहूपुरीवर दोन्ही राजांची मुख्यत्वे मदार आहे. त्यामुळे कण्हेर पाणीपुरवठा योजनेचा हुकमी पत्ता खेळण्यास खासदार गट सज्ज आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केली आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व संपर्क मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सज्ज झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यात बैठक घेऊन स्वबळाचा शड्डू ठोकला आहे. त्यामुळे प्रभागनिहाय आरक्षणापूर्वीच पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.