चऱ्होली (वार्ताहर) – भोसरीतील दिघी रोड येथे राहणाऱ्या प्रीती भालेराव-हुंबरे यांनी घरकाम व मुलांचा सांभाळ करत अर्धवट राहिलेले बारावीचे शिक्षण पूर्ण केले. तब्बल 15 वर्षांनंतर बारावीची परीक्षा देत कला शाखेत त्यांनी घवघवीत यश संपादन केले. भोसरी परिसरात वृत्तपत्र वितरण करणारे नाथान हुंबरे हे त्यांचे पती. त्यांनी प्रीती यांना मोलाची साथ देत शिक्षणाचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले.
वृत्तपत्र वितरण करून तुटपुंज्या कमाईवर संसाराचा गाडा किती दिवस ओढायचा? पतीचे शिक्षण कमी असल्यामुळे हाताला चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा मिळत नव्हती. त्यामुळे पतीच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्नी प्रीतीने आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करून अनोखी भेट देण्याचा ध्यास घेतला. पुढील शिक्षणासाठी नगर जिल्ह्यातील पानेगाव येथील सेंट पॉल विद्यालयात बाहेरून प्रवेश घेतला. घरातील सर्व कामे व दोन मुलांचा सांभाळ करीत स्वतः अभ्यास केला. अभ्यासातील सातत्य व असणारी रुची यामुळे प्रीतीने बारावीला कला शाखेत 74 टक्के गुण संपादन करत विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. या यशात पती नाथान हुंबरे, भाऊ सागर भालेराव यांनी पुढाकार घेतला.
तुटपुंज्या पगारात घरखर्च भागवणे शक्य नाही. त्यामुळे चांगली नोकरी मिळवायची तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. परिस्थिती माणसाला सर्व काही शिकविते. फक्त या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा गरजेचा आहे. त्यामुळेच मी यश मिळवू शकले. माझ्यासारख्या अनेक गृहिणीसुद्धा आपले अर्धवट शिक्षण जिद्दीच्या जोरावर पूर्ण करू शकतात.
– प्रीती हुंबरे