नव्यांची चुळबूळ अन्‌ विद्यमानांची घालमेल; सरसकट सरपंच आरक्षणामुळे गावागावात खळबळ

– राहुल गणगे 

पुणे – जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींचे गाव कारभारी आता 9 व 10 रोजी एकाच दिवशी ठरणार आहेत. याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तर जानेवारी ते डिसेंबर 2021 अखेर मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची माहिती घेण्यास जिल्हा प्रशासनाने सुरूवात केली आहे.

सध्या जिल्ह्यात जानेवारी-डिसेंबर 2021 अखेर मुदत संपणाऱ्या 58 तर नव्याने स्थापन झालेल्या 17 अशा एकूण 75 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या व निवडणूक होणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण सरकारने सरसकट जाहीर केले आहे. त्यामुळे नव्या गाव कारभाऱ्यांची खर्च सादर करण्यासाठी चुळबूळ सुरू झाली आहे, तर विद्यमान कारभाऱ्यांची आरक्षित उमेदवार शोधण्यासाठी घालमेल सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण (दि. 28) जानेवारी रोजी जाहीर झाले. त्यानंतर गावागावात उमेदवार, सरपंच, पॅनलप्रमुख आपली मतांची जुळणी करण्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागले आहेत.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गावागावांतील उमेदवारांनी खुर्ची मिळवण्यासाठी आश्‍वासने दिली. पार्ट्या झाल्या, अमिषांच्या जोरावर जोरदार प्रचार केला. आपणच निवडून येणार अशी स्वप्ने उराशी बाळगत मोठ्या उमेदीने निवडणूक रिंगणात उतरले होते. परंतु मतदार व तरूणांनी वेगळीच चुणूक दाखवल्याने मातब्बरांना घरचा रस्ता दाखवला. तर घराणेशाहीला मोठी चपराक दिली. त्यामुळे अनेकांची स्वप्ने धुळीस मिळवली आहेत. राज्यात सगळीकडे ग्रामपंचायतीचा निकाल लागत आहेत, यात अनेक प्रस्थापितांना मोठे धक्के बसले आहेत. त्यामुळे गावागावांत तरूणाई आतापासूनच कामाला लागली आहे. यामध्ये गावातील नागरिकांच्या समस्या सोडवणे, त्यांना विविध लाभ मिळवणे, तसेच गावातील अडवणूक झालेल्या नागरीकांची कामे मार्गी लावणे, अशा कामांतून आपला प्रभाव पाडण्याचे काम सध्या गावागावांतील इच्छुकांमधून सुरू असल्याचे दिसून येत आहे.

गावातील प्रत्येक वॉर्डात आपण कोणता उमेदवार टाकल्यास पुढचा उमेदवार पडेल. कोणत्या समाजातील कोणत्या घरातील मते फोडण्यास आपण यशस्वी ठरू. तसेच आपल्याला कोणाचा कसा फायदा करून घेता येईल. राजकीय गणिते कशी जुळतील आणि आपणच आपला पॅनल कसा निवडून आणू याबाबत आडाखे बांधले जात आहे.

वैऱ्याचा वैरी आपला मित्र कसा होईल याबाबत फोडा आणि राज्य करा अशा युक्‍त्या तरूणांकडून लढवल्या जावू लागल्या आहेत. परंतु गावागावांतील जुन्या जाणत्या खतरों के खिलाडूं पुढे नुकतीच राजकीय गणिते जुळवणाऱ्यांचा सुगावा लागेल की नाही हे निवडणूक काळ आणि निकालानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत गावागावांत गट-तट, भाऊ-बंदकी तसेच नातीगोती फोडाचे अनुभव मतदारांना पाहावे लागणार आहेत.

भेटी-गाठींवर तरुणांकडून भर
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर होताच गावागावांत खळबळ उडाली आहे. उमेदवार व कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातील गल्लीबोळ, वाडी-वस्त्यावरील नागरिकांचे प्रश्‍न, अडचणी जाणून घेण्यास सुरूवात होऊ लागली आहे. प्रत्येक वॉर्डात विद्यमानांनी रखडवलेल्या कामांबाबत तरूणांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. आम्ही तुमचे काम करून देतो, पण आम्हाला विसरू नका, यंदा आमचं बी पॅनल हाय, असा निर्वाळा इच्छुकांमधून केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.