तिहेरी तलाक विरोधी अध्यादेश नव्याने लागू

नवी दिल्ली – तिहेरी तलाक प्रथेला शिक्षापात्र ठरवणारा अध्यादेश आज नव्याने लागू करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज या अध्यादेशवर स्वाक्षरी केली. मंगळवारी हा अध्यादेश नव्याने लागू करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली होती.

तिहेरी तलाक अर्थात “तलाक ए बिद्दत’या प्रथेवर बंदी घालण्याचे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले आहे मात्र राज्यसभेमध्ये हे विधेयक अद्याप प्रलंबित आहे. राज्यसभेमध्ये सरकार अल्पमतात असल्यामुळे हे विधेयक अखेरच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर होऊ शकले नव्हते. सध्याच्या लोकसभेची मुदत 3 जून रोजी संपत असल्याने हे विधेयक बाद होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हा अध्यादेश वर्षभराच्या आत तिसऱ्यांदा लागू करण्यात आला.

याबरोबरच भारतीय वैद्यकीय परिषद (सुधारणा) दुसरा अध्यादेश, कंपनी (सुधारणा) दुसरा अध्यादेश, अनियंत्रित ठेवी योजना (प्रतिबंध) अध्यादेश हे अन्य तीन अध्यादेशही राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर लागू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)