सासवड (पुणे) – 74 वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सासवड येथील गिर्यारोहकांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका असे 350 फूट व्हॅली क्रॉसिंग आणि अतिशय अवघड असे 450 फूट रॅपलिंग करून तिरंगा फडकावून आगळीवेगळी मानवंदना दिली.
या मोहिमेची सुरुवात घाटघर गावातून झाली. टीम एस. एल. एॅडवेंचरचे संस्थापक अध्यक्ष लहू उघाडे, कृष्णा मरगळे आणि तुषार दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रीचे वाटाडे ग्रुपचे अध्यक्ष नितीन जाधव, चंद्रशेखर जगताप, चेतन जगताप, महेश शेडगे यांनी साडेतीनशे फूट व्हॅली क्रॉसिंग करून अवघड असे साडेचारशे फूट रॅपलिंग करत वानरलिंगी सुळका उतरला.
यावेळी गिर्यारोहकांनी तिरंगा फडकावत मानवंदना दिली. जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ला आणि सातवाहन काळातील व्यापारी मार्ग नाणेघाट हा परिसर निसर्ग सौंदर्याची लय लूट केलेला आहे आणि अनेक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. याच ठिकाणी मोहिमेचे आयोजन केले होते. महाराष्ट्राचा नैसर्गिक वारसा जपण्यासाठी गड किल्ले आणि सह्याद्रीतील पर्यटनस्थळांना कचरा मुक्त करण्याचे आवाहन सह्याद्रीचे वाटाडे ग्रुपचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी केले आहे.