चिखलीतील वृक्षतोड होणार टप्प्या-टप्प्याने

दीड हजार वृक्षांपैकी आत्तापर्यंत तोडले 560 वृक्ष


उद्यान विभागाने वाचविले 86 वृक्ष

– विष्णू सानप

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे नियोजित जलशुद्धीकरण केंद्राच्या निर्मितीसाठी सुमारे दीड हजार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. मात्र, सावध भूमिका घेत गरज पडेल तेव्हाच वृक्षतोड करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंत उद्यान विभागाकडून फक्‍त 560 वृक्षांची वृक्षतोड करण्यात आली आहे. आतापर्यंत 86 वृक्षांना वाचवण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आरेच्या धर्तीवर वृक्षतोड होणार का? असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमींकडून विचारला जात होता. मात्र, येथील वृक्ष हे विदेशी वृक्ष ग्लिरीसीडीआ हे स्थानिक पर्यावरणासाठी अनुकूल नसल्याने पर्यावरण संवर्धन समितीने वृक्षतोडीसाठी हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, गरज पडेल तेव्हाच वृक्षतोड करण्याचे धोरण उद्यान विभागाने स्वीकारले आहे. जलशुद्धीकरण केंद्रासाठी शासनाने महापालिका प्रशासनाला चिखली येथे जागा मिळवून दिली आहे. मात्र, येथील वृक्षतोडीमुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तर, यामुळेच येथे अनेकदा अडचणी येत होत्या.

प्रकल्प उभारला जाणार असलेल्या जागेवर 1 हजार 536 वृक्षांपैकी बहुतांश वृक्ष हे ग्लिरीसीडीआ, सुबाभुळ, बाभूळ या जातीचे असल्याने वृक्षतोडीस अडचणी आल्या नाहीत. या वृक्षांचा पर्यावरणाला जास्त फायदा होत नसल्याने या वृक्षलागवडीस बंदी सुद्धा आहे. यामुळे केली जाणारी वृक्षतोड ही नुकसानकारक नसल्याचे उद्यान विभागाचे मत आहे.

जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या क्षेत्रावर एकूण 1 हजार 536 वृक्ष आहेत. त्यात देशी जातीचे केवळ 80 ते 90 वृक्ष आहेत. तर, बाकीचे कमी महत्वाचे वृक्ष आहेत. प्रकल्पाला अडथळा येतील त्या वृक्षांची वृक्षतोड केली जाणार आहे. मात्र, गरज पडेल तेव्हाच टप्प्या-टप्प्याने वृक्षतोड केली जाणार आहे. जे वृक्ष अडथळा बनत नाहीत अशा वृक्षांना वगळले जात आहे. आत्तापर्यंत उद्यान विभागाने 86 वृक्षांना जीवनदान देत वाचवले आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत येथील किती झाडांना जीवनदान मिळणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी जसजसे काम केले जाईल, त्याप्रमाणेच तेथीलच वृक्षतोड केली जात आहे. ज्या ठिकाणी वृक्षतोडीची गरज नाही अशा वृक्षांना तोडण्यात येणार नसून आत्तापर्यंत 86 वृक्षांना वाचवण्यात आले आहे. यापुढे सुद्धा याचप्रकारे वृक्षतोड केली जाणार आहे.
– प्रकाश गायकवाड, वृक्ष अधिक्षक, उद्यान विभाग, महापालिका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.