मेट्रोकडून वृक्षलागवडीला ठेंगा मुदत संपूनही लक्ष्य होईना पूर्ण

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात गेल्यावर्षीपासून 5 हजार वृक्षलागवड करण्याचे लक्ष्य उद्यान विभागाकडून मेट्रोला देण्यात आले होते. मात्र, वृक्षलागवड करण्यासाठी दिलेली मुदत संपून गेली तरी, आद्याप वृक्षलागवडीचे लक्ष्य मेट्रो प्रशासनाला पूर्ण करता आले नाही. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही दिलेल्या मुदतीत वृक्षलागवड करण्यास मेट्रो प्रशासन अपयशी ठरले आहे.

पर्यावरणाचा ढासळता आलेख बघता पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. म्हणून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाच्या उपक्रमात सहभाग घेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने यंदा दीड लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात, मेट्रो प्रकल्पासाठी शहरातील तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात 5 हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य दिले होते. मात्र, यंदा चांगला पाऊस पडूनसुद्धा दिलेल्या मुदतीत लक्ष्य पूर्ण करण्यास मेट्रो प्रशासनाला अपयश आले आहे. 20 डिसेंबर 2019 पर्यंत मेट्रोकडून 4 हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे. उर्वरित 1 हजार वृक्षलागवड बाकी आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाला दीड लाखांचे व मेट्रोला 5 हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. परंतु गतवर्षी प्रमाणे यंदाही वृक्षलागवडीचा लक्ष्यभेद करण्यास अपयश आले आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाला नसल्याने वृक्षलागवड करण्यास उशीर झाला होता. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरीसुद्धा मेट्रोची वृक्षलागवड करण्याची गती वाढली नाही. वृक्षलागवड करण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत संपून तीन महिने उलटून नवीन वर्ष सुरू झाले आहे. मात्र, मेट्रोकडून आद्याप लक्ष्य पूर्ण केले नसल्याने आता टॅंकरच्या पाण्यावर वृक्षलागवड केली जाणार का? असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमी विचारत आहेत. 20 डिसेंबरपर्यंत उद्यान विभागाने 1 लाख 42 हजार 895 वृक्षांचीच लागवड केली आहे.

मेट्रोकडे वृक्षलागवड करण्यासाठी जागा नसल्याने उर्वरित वृक्षलागवड केली गेली नाही. तर, वृक्षलागवड मेट्रोने करावीच अशी मेट्रो प्रशासनावर सक्ती नाही. जागा उपलब्ध करून दिल्यास मेट्रो वृक्षलागवड करेल.
– हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, मेट्रो

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.