कर्मचाऱ्यांनी लावलेल्या रोपट्याचा “वटवृक्ष’

कामगार कल्याण निधीतून 2 कोटी रुपयांचे राबविले उपक्रम
14 कोटी रुपयांच्या ठेवीही जमा
कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून वर्षाला रक्‍कम कपात
1 कोटी 94 लाख 63 हजार रुपयांच्या कल्याणकारी योजना राबविल्या

पुणे  – महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी जमा केलेल्या कामगार कल्याण निधीचा वटवृक्ष झाला असून त्यातून 2 कोटी रुपये खर्चून उपक्रम राबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर 14 कोटी रुपयांच्या ठेवीही जमा झाल्या आहेत.

महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या मान्यतेने सन 2005 पासून कामगार कल्याण निधी निर्माण करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून वर्षाला ठराविक रक्‍कम कपात केली जाऊ लागली. गेल्या चौदा वर्षांमध्ये या पैशांमधून तब्बल दीड कोटी रुपयांच्या ठेवी ठेवण्यात आल्या असून 1 कोटी 94 लाख 63 हजार रुपयांच्या कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. स्वत:च्याच कमाईतील अत्यल्प हिस्सा एकत्र करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष होऊ पहात आहे.

महापालिकेकडून कामगार कल्याण निधीकरिता प्रत्येकवर्षी 100 रुपये कपात केली जात होती. 2015-16 या आर्थिक वर्षापासून ही कपात वर्गनिहाय वाढविण्यात आली. जमा होणाऱ्या निधीमधून महापालिकेच्या एकूण वीस अधिकारी-सेवकांना गुणवंत कामगार पुरस्कार दिला जातो. यामध्ये वर्ग एक आणि दोनसाठी प्रत्येकी एक पुरस्कार, वर्ग तीनसाठी पाच तर वर्ग चारसाठी 13 सेवकांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा पुरस्कार दिला जातो. तर, सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेल्या सेवकांच्या वारसांना पूर्वी 50 हजार रुपयांचा निधी दिला जायचा. मात्र, 2015 पासून त्यामध्ये वाढ केली असून कल्याण निधीमधून 22 हजार 500 आणि मनपा निधीमधून 52 हजार 500 असे एकूण 75 हजार रुपये दिले जात आहेत. जर सेवक कल्याण निधीचा सेवक नसेल तर केवळ महापालिकेचाच निधी मिळतो.

कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी अधिकाधिक 25 हजार रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती स्वरुपात देण्यात येणारे हे कर्ज बिनव्याजी असून ही रक्‍कम संबंधित सेवकाच्या खात्यामधून दरमहा 1 हजार रुपयांप्रमाणे कापून घेतली जाते. यासोबतच कामगारांसाठी दरवर्षी क्रिकेट, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, धावणे, पोहणे, लांब उडी, गोळा फेक, बुद्धीबळ, कुस्ती, कबड्डी, स्लो सायकलिंग, रांगोळी आदी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. तसेच, सेवकांच्या दहावी-बारावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलांचा सत्कारही केला जातो. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीदरम्यान दरवर्षी “आळंदी ते पुणे’ अशी कामगार दिंडीचेही आयोजन करण्यात येते. या दिंडीमधून महापालिकेच्या विविध उपक्रमांबाबत जनजागृती केली जाते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×