पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टरांचा संप मिटला

सरकारी रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश

कोलकाता – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टरांनी सोमवारी संप मागे घेतला. ममता बॅनर्जी यांनी सर्व सरकारी रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

पश्‍चिम बंगालमधील एनआरएस रुग्णालयातील दोन डॉक्‍टरांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.मारहाणीच्या निषेधार्थ गेल्या आठवड्याभरापासून डॉक्‍टर संपावर गेले होते. पश्‍चिम बंगालमधील या घटनेचे पडसाद देशभरातही उमटल्याचे पाहायला मिळाले.

याप्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्‍टरांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देत चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. दोन वेळा प्रस्ताव नाकारल्यानंतर डॉक्‍टरांनी प्रसारमाध्यमांसमोर चर्चा करण्याच्या अटीवर सोमवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.

राज्य सचिवालयात आयोजित बैठकीत दोन प्रादेशिक वाहिन्यांना परवानगी देण्यात आली होती. या बैठकीत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्य सरकारने कोणत्याही डॉक्‍टरविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. आम्ही पर्यायी मार्गाचा अवलंब केला आहे. एनआरएस रुग्णालयात झालेली घटनेच्या पार्श्वभूमीवर पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.