पुणे, – दिवाळीनंतरही रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक रूळावर येत नसल्याचे दिसून येत आहे. मागील दोन दिवसांमध्ये पुण्यातून सुटणाऱ्या नऊ ते दहा ट्रेन्सना दोन ते नऊ तासांपर्यंत उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत थांबावे लागत आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या ट्रेन्सचा समावेश आहे.
पुणे रेल्वे विभागातून दररोज दोनशे ट्रेन्स धावतात. त्यामधून साधारण पावणेदोन लाख नागरिक प्रवास करतात. रेल्वेकडून ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये दिवाळी व छट पूजेसाठी तीनशेपेक्षा अधिक विशेष ट्रेन्स सोडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली. पण, ट्रेन्सची संख्या वाढल्यामुळे वेळापत्रक दिवाळीमध्ये काहीसे विस्कळीत झाले. दिवाळीनंतर हे वेळापत्रक सुधारेल असे वाटत असताना, महिनाअखेरीसही वेळापत्रक बिघडलेलेच आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरून रविवारी लांब पल्ल्यांच्या सुटणाऱ्या सहा ट्रेन्सना चार ते आठ तासांपर्यंत उशीर झाल्याचे दिसून आले. त्यापैकी काही ट्रेन्स नियमित सुटणाऱ्या तर काही ट्रेन्स विशेष होत्या. तर, सोमवारीही दोन ट्रेन्सना उशीर झाला. त्यामध्ये पुणे-मुझ्झफरपूर, पुणे-नागपूर आणि पुणे-हमसफर एक्स्प्रेसला सात ते नऊ तासापर्यंत उशीर झाला. तर पुणे-नांदेड, हडपसर-झांशी विशेष, पुणे-मालदा विशेष, पुणे-हरंगुळ ट्रेन्सना तीन ते सहा तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला.