- दुचाकीस्वारास अटक
- हिंजवडी येथे नाकाबंदी दरम्यान घडली घटना
पिंपरी – नाकाबंदीची कारवाई सुरू असताना एका वाहतूक पोलिसाला धक्का देऊन 50 फुटापर्यंत फरफटत नेले. या घटनेत पोलीस जखमी झाला आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक केली आहे. वाकड- हिंजवडी रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर वाकड येथे शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
संजय एकनाथ शेडगे (वय 42, रा. आढले खुर्द, ता. मावळ) असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शंकर तुकाराम इंगळे (वय 47) असे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. 28) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी इंगळे हे पोलीस हवालदार असून ते हिंजवडी वाहतूक विभागात कर्तव्यावर आहेत. फिर्यादी व त्यांचे सहकारी हिंजवडी रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी करीत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी शेडगे याची दुचाकी पोलिसांनी बाजूला घेतली. पोलिसांनी त्याच्याकडे लायसन्स आणि इतर कागदपत्रांबाबत विचारणा केली.
त्यावेळी आरोपीने फिर्यादीला धक्का दिला. तसेच गाडी चालू करून पळून जाऊ लागला. त्यावेळी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या गाडीच्या मागील बाजूस फायबरच्या कॅरियरमध्ये फिर्यादीचा हात अडकला. त्यावेळी फिर्यादी त्याला ‘थांब थांब’ असे म्हणाले. तरीही आरोपीने गाडी न थांबता फिर्यादीला 50 फूट फरफटत नेले. त्यामुळे मार लागून फिर्यादी इंगळे यांना दुखापत झाली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.