नगरचे मार्केट यार्ड दर बुधवारी होणार निर्जंतुक

करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडते असोसिएशनचा पुढाकार
नगर (प्रतिनिधी) – नगर शहरासह जिल्ह्यात करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्याचे संक्रमण रोखण्यासाठी नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत संकुलात दर बुधवारी निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, काल संपूर्ण संकुलात औषध फवारणी करण्यात आली.

भाजीपाला, फळे खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, ग्राहक व कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दर बुधवारी ट्रॅक्‍टरद्वारे ही औषध फवारणी करण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सनी सुर्यवंशी व असोसिएशचे अध्यक्ष अशोक लाटे यांनी सांगितले.

आडते व्यापारी अशोक निमसे, पंकज कर्डिले, अनिल ठुबे, नंदकिशोर शिकरे, मोहन गायकवाड, सुनील विधाते, विजय खताळ, सारंग लाटे, किशोर बोडखे, पियुष कर्डिले आदींनी त्यासाठी परिश्रम घेतले. करोनाचा प्रादुर्भाव हटत नाही, तोपर्यंत असोसिएशनने दर बुधवारी संकुलात औषध फवारणी करावी, अशी सूचना आमदार संग्राम जगताप यांनी केली होती. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संचालक सूर्यवंशी व अध्यक्ष लाटे यांनी सांगितले.

बाजार समितीच्या आवारात भाजीपाला, फळ व फुल विक्रीसाठी दररोज जिल्ह्यातून शेतकरी व ग्राहक वर्ग येत आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व सामाजिक बांधिलकी म्हणून अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशने घेतलेला औषध फवारणीचा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उपक्रमातून इतरांनी प्रेरणा घेतल्यास करोना संक्रमण रोखण्यास खूप मदत होईल.
आमदार संग्राम जगताप

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.