अकोले (प्रतिनिधी) – दूध घेवून चाललेल्या आजीबाई रस्त्याच्या कडेला थांबल्या. यावेळी बिबट्याने डरकाळी फोडल्याने आजीबाईने कुठलाही विचार न करता बाजूच्या खड्ड्यात उडी घेतली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
काल सकाळी सात वाजता दूध घेऊन जाणाऱ्या अंजनाबाई राजाराम भोईर या बांगरवाडी (राजूर) गावातून मधल्या रस्त्याने राजूरकडे निघाल्या होत्या.रस्त्यात किटलीचे ओझे जड झाले म्हणून त्यांनी किटली खाली ठेवली. आणि रस्त्याच्या कडेला प्रातर्विधीसाठी खाली उतरल्या.
त्याच वेळी दबा धरून बसलेला बिबट्या अचानक किटली जवळ आला आणि त्याने डरकाळी फोडली. त्याच्या आवाजाने अंजनाबाई अर्धमेल्या झाल्या. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट खोल खड्ड्यात स्वतःला झोकून दिले. त्यात त्या बेशुद्ध पडल्या. अर्धा तास त्या मोठ्या खड्ड्यात तशाच पडून राहिल्या.
बिबट्याने किटलीस जोराचा फटका मारत व तिच्यावर पाय ठेवून दूध सांडून दिले व तो रस्त्याच्या विरुद्ध दिशेला निघून गेला. अर्धा-एक तासाने अंजनाबाई शुद्धीवर आल्या. त्यावेळी त्याच्या कंमरेला मार लागला होता. त्या त्याच अवस्थेत उठून रस्त्यावर आल्या.
त्यावेळी दूध रस्त्यावर सांडलेले होते.त्यांनी किटली घेऊन जखमी अवस्थेत घर गाठले आणि घरच्यांना घडलेला प्रकार कथन केला. मग दवाखान्यात नेऊन त्यांचेवर औषधोपचार करण्यात आले. याबाबत वनविभागाकडे चौकशी केली. मात्र सर्वांनी कानावर हात ठेवले. प्रभारी उपविभागीय वनअधिकारी झोळे यांना संपर्क केला. पण त्यांनीही आपणास याबत माहिती नाही, असे सांगितले.