कापूरहोळच्या भरचौकात दरोडेखोरांचा थरार

गोळीबार करीत सराफाला लुटले : 27 लाखांचा ऐवज गायब : दरोडेखोर पोलीस, आरोपींची “वर्दी’ घालून

कापूरहोळ – पुणे- सातारा महामार्गवरील गजबजलेल्या कापूरहोळ (ता. भोर) येथील वर्दळीच्या चौकात बालाजी ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी आरोपी-पोलिसांचा गणवेश परिधान करून दुकानात घुसून गोळीबार करीत सराफाला लुटले. यात दरोडेखोरांनी 27 लाखांचा ऐवज लुटला आहे. गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना गुरुवारी (दि. 6) दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.

येथील बालाजी कॉम्प्लेक्‍समध्ये बालाजी सराफ पेढी आहे. गुरुवारी दुपारी 4.45 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीतून उतरले. यातील दोन जण पोलिसांच्या गणवेशात होते. त्यांनी तीन जणांना बेड्या घालून सराफी दुकानात आणले. दुकान मालकाला या कथित आरोपींनी चोरीचा माल तुम्हाला विकला आहे, तो माल आमच्याकडे द्या, असे म्हणून पोलीस वेषातील दरोडेखोर सराफाला दमदाटी करू लागले. तुझ्या दुकानातील सर्व दागिने दाखव म्हणून त्यांना दुकानमालकाला दमदाटी केली. दुकानदाराने सर्व सोने दाखवताच चोरट्यांनी दागिने बॅगेत भरण्यास सुरुवात केली. यावेळी एकाने दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोराने शेजारी कापड दुकानच्या काचेवर एक, मेडिकल दुकानाच्या बोर्डावर एक, काउंटरला एक आणि तीन गोळ्या हवेत, अशा सहा गोळ्या झाडून दरोडेखोर पसार झाले.

या लूटमारीत सुमारे 26 ते 27 लाखांचे दागिने लुटून नेल्याची माहिती दुकान मालक संजय किसन निकम यांनी दिली आहे. हे दरोडेखोर सारोळा, शिरवळ गावच्या दिशेने पसार होताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर राजगड पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. दरोडेखोर चारचाकीतून सातारच्या दिशेने पसार झाल्याने सारोळा, सासवड, नीरा आदी ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांना देखील याची माहिती दिली आहे. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक वेताळ करीत आहेत.

  • किकवी दूरक्षेत्र दूरध्वनी असता तर..
    कापूरहोळ येथील भरचौकातील दुकानापासून सातारा आणि पुण्याच्या बाजूकडे तीन किलोमीटर अंतरावर किकवी पोलीस दूरक्षेत्र आहे मात्र, तिथे दूरध्वनी नाही. त्यामुळे नागरिक आणि तक्रारदारांना माहिती देण्यासाठी ठाण्याच्या समक्ष जावे लागते. ही घटना घडल्यानंतर नागरिकांना माहिती देण्यासाठी तेथील दूरध्वनीचा उपयोग झाला नाही. दूरध्वनी असता तर दरोडेखोर जेरबंद झाले असते, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.