डार्विन – करोनामुळे बंद पडलेल्या क्रिकेटसाठी आजपासून अनुकूल सद्दी सुरू होत आहे. आजपासून ऑस्ट्रेलियात तीन दिवस सीडीयु टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. तीन दिवस ही स्पर्धा होणार असून त्यात निवडक 500 प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहून सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
करोनामुळे ऑस्ट्रेलियात जरी 6 महिन्यांचा लॉकडाऊन असला तरीही गेल्या दोन आठवड्यात या शहरात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याने या स्पर्धेला ऑस्ट्रेलिया सरकार व ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने परवानगी दिली आहे. युरोपातील करोनाचा धोका जवळपास संपुष्टात आल्याने तिथे काही फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरीही त्यात प्रेक्षकांना मैदानावर येण्याची मनाई करण्यात आली होती. आजपासून सुरू होत असलेल्या टी-20 स्पर्धेला मात्र, 500 प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रेक्षकांच्या उपस्थितीत होत असलेली ही मार्च महिन्यानंतरची ही पहिलीच स्पर्धा आहे. या स्पर्धेत एकंदर 15 सामने होणार असून एकूण 8 संघांत ही स्पर्धा होत आहे. आजपासून सोमवारपर्यंत स्पर्धा होणार असून शहरातील 3 मैदानांवर हे सामने होतील. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. जर ही स्पर्धा कोणत्याही संकटाशिवाय पार पडली तर ऑस्ट्रेलियात आगामी ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या टी-20 विश्वकरंडकासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.