खालापूर, – मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी (दि.२) रात्री एकच्या सुमारास एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने गाडीतील चालकाने प्रसंगावधान दाखवून प्रवाशांना गाडीबाहेर उतरविल्याने जिवितहानी टळली. परंतु वाहनाचे नुकसान झाले आहे.
द्रुतगती मार्गावरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असलेली रेनॉल्ड कंपनीची क्विड कार (क्रमांक एमएच १२ एनपी ००६०) ही आडोशी बोगद्याजवळ आली असता कारच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे चालक अनिल अग्रवाल (रा. पुणे) यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेऊन सहप्रवाशांना कारमधून उतरवले. त्यानंतर लगेचच कारने पेट घेतला.
आयआरबी, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य आदी यंत्रणा घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच कारने पूर्णतः पेट घेतला होता. आगीत जीवितहानी घडली नसली तरीही कारचे नुकसान झाले. क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आले.