हैदराबाद – तेलंगणमधील आमदार रमेश चेन्नमनेनी भारताचे नव्हे; तर जर्मनीचे नागरिक आहेत. ती माहिती थेट केंद्र सरकारने बुधवारी तेलंगण उच्च न्यायालयात दिली. चेन्नमनेनी हे तेलंगण राज्यातील सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) आमदार आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने मागील वर्षी त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला. त्याला आमदार महोदयांनी न्यायालयात आव्हान दिले. त्यावरून न्यायालयाने मागील महिन्यात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उत्तर मागवले होते.
त्याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी गृह मंत्रालयाने चेन्नमनेनी जर्मनीचे नागरिक असून त्यांच्याकडे त्या देशाचा पासपोर्ट असल्याची माहिती दिली. आता पुढील सुनावणी पुढील महिन्यात होणार आहे. चेन्नमनेनी प्रदीर्घ काळापासून नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून न्यायालयीन लढा देत आहेत. ते तिसऱ्यांदा आमदार बनले आहेत.
जर्मनीचा पासपोर्ट बाळगल्यावरून आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने 2013 मध्ये त्यांची विधानसभेवरील निवड रद्दबातल ठरवली होती. त्यानंतर चेन्नमनेनी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर चेन्नमनेनी यांनी 2014 आणि 2018 मधील विधानसभा निवडणुका लढवून त्यात विजय मिळवला.
भारतात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही. त्यामुळे भारतीय नागरिक नसलेली व्यक्ती निवडणूक लढवण्यास किंवा मतदानास पात्र नसते.