लखनौ – स्वामी प्रसाद मौर्य यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. मौर्य हे कुशीनगर जिल्ह्यातील फाझीलनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आज (गुरुवारी) सकाळी ८ वाजल्यापासून निवडणुका पार पडलेल्या ५ राज्यांमध्ये मतमोजणी सुरु आहे. ५ पैकी ४ राज्यांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली असून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा बोलबाला पाहायला मिळतोय. अशातच निवडणुकांच्या तोंडावर भाजपची साथ सोडून अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश केलेल्या स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान व धरमसिंह सैनी यांच्या मतदारसंघात काय निकाल लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जाणून घेऊयात या मतदारसंघातील आकडेवारी…
सपाच्या स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर; भाजपच्या सुरेंद्र कुमार कुशवाह यांच्याकडे भक्कम आघाडी
: ओबीसी समाजाचे नेते मौर्य हे कुशीनगर जिल्ह्यातील फाझीलनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते सध्या पिछाडीवर असून त्यांना भाजपच्या सुरेंद्र कुमार कुशवाह यांनी बरंच मागं सोडलं आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीनुसार कुशवाह यांना आतापर्यंत ५२४३० इतकी मत मिळाली आहेत. तर मौर्य यांना २७०६१ इतकी मत मिळाली आहे. म्हणजेच कुशवाह यांनी जवळपास २७ हजारांची भक्कम आघाडी घेतली आहे.
दारा सिंह चौहान व विजय कुमार राजभर यांच्यात जोरदार लढत
: योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केलेलं दुसरं नाव म्हणजे दारा सिंह चौहान. दारा सिंह चौहान हे घोसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्राप्त माहितीनुसार त्यांना ५२०८० मत मिळाली आहे. त्यांच्याखालोखाल भाजपचे विजय कुमार राजभर असून त्यांना ५०२४७ मत मिळाली आहेत. या मतदारसंघामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
धरमसिंह सैनी यांच्याकडे किरकोळ आघाडी
: नाकूर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या सैनी यांना देखील भाजप उमेदवार मुकेश चौधरी यांच्याकडून कडवी झुंज मिळत आहे. सैनी यांना १००६८८ तर चौधरी यांना १००४७६ मत मिळाली आहेत. सैनी यांनी देखील योगी मंत्रिमंडळातून राजीनामा देत अखिलेश यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता.