नवी दिल्ली: एखाद्याच्या आयुष्यात त्याचा वाढदिवस आणि वाढदिवसाला जवळच्या व्यक्तीकडून मिळालेली भेटवस्तू ही अमूल्य असते. ती वस्तू जपून ठेवल्यास सगळेच जण धडपड करताना दिसतात. मात्र जर तीच भेटवस्तू तुम्हाला त्रासदायक होत असेल तर. होय, एका तरुणीला तिच्या वडिलांनी दिलेली भेटवस्तू तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक होताना दिसत आहे. या भेट्वस्तूमुळे चक्क तिचे घराबाहेर पडणंच कठीण झाले आहे.
दिल्लीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका तरूणीला तिच्या वडिलांनी तिच्या वाढदिवसाला एक स्कुटी गिफ्ट केली. तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला ही गाडी आणून दिली. परंतु तिची डोकेदुखी सुरु झाली ती या गाडीला मिळालेल्या तिच्या नंबर प्लेटवरून. संबंधित तरुणीच्या स्कूटीला आरटीओकडून जो नंबर देण्यात आला त्यात नंबरच्या मध्ये S.E.X ही अक्षरे येत आहेत.
संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना जराही कल्पना नव्हती की या नंबर प्लेटमुळे त्यांची डोकेदुखी होईल. गाडीच्या नंबरमध्ये असणारे S.E.X ही अक्षरं अनेकांना विचित्र वाटू लागली. याशिवाय अनेकांनी रस्त्यातही संबंधित तरुणीच्या भावालाही सतावण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार भावाने घरी सांगितल्यानंतर तरुणीदेखील घाबरली असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर संबंधित तरुणीने आपल्या गाडीचा नंबर बदलण्याची मागणीही केली.
दिल्ली आरटीओच्या एका अधिकाऱ्याकडून दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १० हजार गाड्यांसाठी या सीरिजचे नंबर अलॉट करण्यात आले आहेत. परंतु लोकांच्या टोमण्यांपासून वाचण्यासाठी संबंधित तरुणीने घराबेहर पडणेही बंद केले आहे. दरम्यान, तिने ही नंबर प्लेट बदलण्याची मागणी केली असून हे खरंच शक्य आहे का हा प्रश्न निर्माण होतो. एकदा गाडीला नंबर अलॉट झाल्यानंतर तो बदलण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. ही प्रक्रिया एका सेट पॅटर्ननुसार चालते, असे सांगण्यात येत आहे.