लेप्टनंट जनरल जे. के. शर्मा : 214 जवानांचा शपथग्रहण सोहळा उत्साहात
नगर – आजच्या बदलत्या वातावरणात देशाला बाहेरील शक्तींकडून नव्हे तर अंतर्गत विघटनवादी शक्तींकडूनही धोका आहे. आणि आपल्या त्या विरोधातही लढावं लागणार आहे. देशाची एकता आणि अखंडता कायम राखून यात बाधा आणणाऱ्या शक्तींना रोखले पाहिजे आणि ते काम तुम्ही कराल, असा मला विश्वास वाटतो, असे प्रतिपादन लेप्ट. जनरल जे. के. शर्मा यांनी केले.
एमआयआरसीच्या अखोरा ड्रील मैदानावर झालेल्या 424 व्या तुकडीतील 214 जवानांच्या शपथग्रहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला कर्नल विनायक शर्मा, कर्नल रसल डिसुजा, ब्रिगेडीयर व्ही.व्ही. सुब्रम्हण्यम आणि सेंट्रल कमानचे मुख्य लेप्ट.जनरल जे.के. शर्मा उपस्थित होते. एमआयआरसीचे बोधवाक्य, वीरता आणि विश्वास असे आहे.
वीरता म्हणजे आपल्या ठायी असलेलं मनोबल, आत्मसन्मान, न्यायभावना आणि दृढनिश्चय तर विश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास आपल्या हत्यारांवरचा विश्वास सहकाऱ्यांवरचा विश्वास आणि आपल्या कमांडर मधल्या नेतृत्व गुणांवरचा विश्वास आणि देशाच्या पूर्ण विचारांवरचा विश्वास होय. 36 आठवड्यांच्या कठोर परिश्रमानंतर तुमच्यात आणि बाहेर वावरणाऱ्याच्यात मोठा फरक दिसतो तो तुम्ही सार्थ ठरवाल, असा मला विश्वास आहे, असेही शर्मा म्हणाले.
याप्रसंगी जनरल सुंदरजी यांच्या नावाने दिले जाणारे सुवर्णपदक रिक्रुट किरण पवार याला जनरल के.एल. डिसूजा रजतपदक, रिक्रुट साहिल कुमार, जनरल पंकज जोशी कांस्यपदक, रिक्रुट विवेक ठाकूर यांना प्रदान करण्यात आले. या शपथग्रहण सोहळ्यानंतर जवानांच्या माता-पित्यांचाही गौरवपदक देऊन सन्मान करण्यात आला.