प्रेमीयुगुलाचे गळफास प्रकरण : मयत मुलीच्या आईची फिर्याद
नगर – आंतरजातीय प्रेमसंबंध कुटुंबीयांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने गळफास घेतला. यात युवतीचा मृत्यू झाला होता. युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जखमी प्रियकर मुकुंद बाबासाहेब भोजने (वय.25, रा. कडा. ता. आष्टी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत अवंतिका रघुनाथ दळवी (वय 21 रा. कडा, ता. आष्टी) हिची आई आशा रघुनाथ दळवी यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, अवंतिका व मुकुंद यांचे एकमेकांवर प्रेम होते. यातून दोघांनी मंगळवारी रात्री चिचोंडी पाटील येथे गळफास घेतला. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी अवंतिका ही पुण्याला असताना भोजने यांनी तिला आत्महत्या करण्याची धमकी देऊन बोलावून घेतले. त्यानंतर तिला आत्महत्येस प्रवृत्त केले व स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस मुकुंद भोजने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भोजने यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तपास स.पा.नि. प्रकाश पाटील हे करीत आहेत.