अग्रलेख : धोका आणि काळजी

करोनाचा धोका अद्याप कायम आहे. जगाच्या अन्य देशात विषाणूने स्वरूप बदलल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आव्हान कायम आहे. अंगोला, टांझानिया आणि द. आफ्रिकेतून परतलेल्या चार लोकांमध्ये विषाणूचा नवा प्रकार दिसून आला. ब्राझीलमधून आलेल्या व्यक्‍तीतही करोनाचे वेगळे रूप पाहायला मिळाले. सप्टेंबरमध्येही असेच घडले होते. ब्रिटनमधून मायदेशी परतलेले लोक करोनाचा नवा अवतार घेऊन आले होते. त्यावेळीही बेफिकिरी झाली. 

विषाणू स्वरूप बदलत असतात याची कल्पना होती. मात्र, पुन्हा त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे 200 ब्रिटन रिटर्न भारताच्या वेगवेगळ्या शहरांत पोहोचले. तेव्हाही काळजाचा ठोका चुकला. कारण या नव्या अवताराचा प्रसाराचा वेग 70 पट जास्त असल्याचे बोलले गेले. सुदैवाने अद्याप तसे काही झाल्याचे आढळून आलेले नाही. केंद्रशासित प्रदेशांसह देशाच्या अन्य राज्यांत स्थिती नियंत्रणात आहे. पहिल्या टप्प्यात ज्या राज्यांत प्रसार वेगाने झाला होता, तेथेही दिलासादायक स्थिती आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, ईशान्येकडची राज्ये, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथे नव्याने काही झालेले नाही. मात्र, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांची झोप उडाली आहे. 

महाराष्ट्रात 10 फेब्रुवारीपासून बाधितांची संख्या सातत्याने वाढते आहे. केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातसुद्धा ही स्थिती चिंता निर्माण करणारी आहे. यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यांत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अन्य दोन जिल्ह्यांतही तो केला जाऊ शकतो, असे सूतोवाच करण्यात आले आहे. मुंबईत निर्बंध लादले जात आहेत. पुण्यातही पुन्हा लॉकडाऊनचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्‍टोबरनंतर बाधितांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली होती. दिवाळीच्या सुमारास काही निर्बंध शिथिल केले होते. पुन:श्‍च हरिओम म्हणत काही व्यवहार सुरळीत केले होते. मात्र, धरणाची दारे उघडल्यावर पाणी जसे सुटते तशी गर्दी रस्त्यावर सुटली. डिसेंबर अथवा जानेवारीत रुग्णसंख्या वाढेल असा अंदाजही वर्तवला गेला. सुदैवाने तसे झाले नाही त्यामुळे दिलासा मिळाला. मात्र, अनलॉकमध्ये जसे निर्बंध उठवले जाऊ लागले तसे लोकांनी जी आचारसंहिता स्वत:वर लादून घेतली होती तीही स्वत:च उठवली का, हा आताचा प्रश्‍न आहे. त्याला कारण गेल्या आठवडाभरात राज्यातील रुग्णांची संख्या रोज पाच हजारांपर्यंत पोहोचते आहे. 

देशात 10 ते 12 हजारच्या टप्प्यात रुग्ण रोज सापडत असताना एकट्या महाराष्ट्राने त्यातील निम्मा वाटा उचलावा हे भूषणावह नाही. महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांतील बाधितांची संख्या एकूण बाधितांच्या संख्येत 75 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली आहे. यातून या राज्यांनी काय घ्यायचा तो बोध घेणे आवश्‍यक आहे. मंदिरे, शाळा सुरू करण्याचा आग्रह भोवतोय का? शाळा आणि महाविद्यालयांची तर गंमतच झाली आहे. शेवटच्या महिनाभरात मुलांना शाळेत बोलावून आणि त्यांचा व शिक्षकांचा जीव टांगणीला लावून शिक्षण क्षेत्राचे काय भले होणार आहे? दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यातले काही जण आता बाधित झाले आहेत. आता काय करणार, हा त्यांना आणि पालकांनाही मोठा प्रश्‍न. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची घाई करण्याची खरंच गरज होती का? पालकांकडून संमतीपत्र घ्यायचे आणि आपली जबाबदारी संपली असला प्रकार करोनाबाबतीत घातक आहे. जोपर्यंत त्याचा प्रभाव नाहीसा होत नाही तोपर्यंत बचाव हाच सुरक्षित पर्याय आहे. त्याकरता धर्म-आस्था आदी सगळे बाजूला ठेवायला हवे. केंद्राचे पथक येऊन गेले आहे. 

महाराष्ट्रात मुळीच पथ्ये पाळली जात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली आहे. त्यांची नाराजी बाजूला ठेवू. गेल्या मार्चनंतर आपण जे अनुभवले ते तर आपल्याला ठाऊक आहे. पुन्हा त्या वाटेने जायचे आहे का? लसीकरण सुरू करण्यात आले. त्याचसोबत अफवांचेही लसीकरण सुरू झाले. शंका उपस्थित केल्या जात आहेत. लसीच्या उपयुक्‍ततेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. मात्र, लस आवश्‍यक आहे हे सोईस्कर दुर्लक्षित केले जाते आहे. लसीकरणाकरता जे नोंदणी ऍप आणि मेसेज पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यातही गोंधळाची स्थिती आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीही लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे आढळून आले आहे. जोपर्यंत जगातल्या प्रत्येक व्यक्‍तीपर्यंत लस पोहोचत नाही तोपर्यंत धोका कायम आहे. हे विसरून चालणार नाही. त्यामुळे लस दारात अगदी उंबरठ्यापर्यंत आली आहे त्यानंतर पाठ करून उभे राहणे शहाणपणाचे नाही. 

आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला मान होता. कारण सगळ्यांत जास्त धोकाही त्यांनाच असतो. त्या धोक्‍याचा मुकाबला त्यांनीच गेले वर्षभर केला. असे असताना त्यांनी धीराने घेणे आणि इतरांना धीर देणे महत्त्वाचे आहे. एकट्या शहरात रोज पाचशेच्या घरात रुग्ण सापडू लागले तर पुन्हा सगळी बंधने येतील. तरीही स्थिती आटोक्‍यात आली नाही तर लॉकडाऊनचा बडगा आहेच. लस नव्हती तेव्हा सगळी अनिश्‍चितता होती. केव्हा येणार तेही माहीत नव्हते. सगळीकडे काळोख दाटला तर धाडस करण्याचे टाळले जाते. मात्र आता आपल्याला मार्ग सापडला आहे. तर भय बाजूला ठेवायला हवे. देशभरात एक कोटीच्या आसपास लसीकरण झाले आहे. कुठूनही कोणती वाईट बातमी नाही. मात्र काही शंकासूर नकारात्मक विचार आणि बातम्या पसरवण्यात गुंतले आहेत. 

लस घेतल्यानंतरही करोना झाला असे त्या बातम्यांचे स्वरूप आहे. मात्र, लस घेतल्यावर अँटीबॉडीज तयार व्हायला पंधरा दिवस लागतात हे अगोदरच सांगितले होते. त्या काळातही काळजी घेतली पाहिजे, असेही बजावण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्ष केले तर इप्सित साध्य कसे होणार? लस घेणाऱ्यांनी स्वत:च्या सुरक्षेचे सर्व नियम पाळणे आवश्‍यक होते. तेथे बेफिकिरी शूरपणाचे लक्षण म्हणता येणार नाही. कोणतीही लस शंभर टक्‍के सुरक्षा देत नाही. आतापर्यंत तसा दावा कोणी केलेला नाही. तर आपल्या क्षमतेनुसार रोगाच्या संसर्गाची तीव्रता ती कमी करत असते. असे असताना “घेतली लस झाला मोकळा’ असे धोकादायक ठरू शकते. करोनाच्या विरोधातील लढाई आपण निम्मेपेक्षा जास्त जिंकली आहे. आता शेपूट तेवढे वळवळते आहे. त्याला वेळीच ठेचण्याची आवश्‍यकता आहे. 

पहिल्या लाटेत जेवढी काळजी घेतली होती तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त काळजी घेण्याची आता गरज आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. गैरसमज सगळ्यांत प्रथम दूर करणे आवश्‍यक आहे. शासकीय यंत्रणाच सगळे करू शकत नाही. त्यामुळे खासगी यंत्रणेची मदत घेण्याचाही विचार व्हायला हवा. लसींची उपलब्धता असेल तर वर्गवारी करून त्याच वर्गातील लोकांची वाट पाहात बसण्यापेक्षा ज्यांना लस घेण्याची इच्छा आहे त्यांच्या मार्गात असलेले अडसर दूर केले तरी बऱ्यापैकी ध्येय साध्य होऊ शकते. शेवटी लसीपासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावीच लागणार आहे. मात्र ज्यांना संधी दिली जातेय तेच उदासीन असतील तर त्यांच्यासाठी रांगेत मागे उभे असणाऱ्यांना संधी नाकारण्यातही काही हशील नाही. सरकारने याचाही विचार करून जी कुंपणे स्वत:हून घालून घेतली आहेत, ती त्वरित दूर करावीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.