चिंताजनक! दिल्लीत करोनाची तिसरी लाट

नवी दिल्ली – दिल्लीत पुन्हा करोनाचे पेशंट वाढू लागले असून हा प्रकार म्हणजे दिल्लीत आलेली करोनाची तिसरी लाटच म्हणावी लागेल, असे त्या राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तथापि या स्थितीवर सरकार बारीक लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असा दिलासाही त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, ही लाट थोपवण्यासाठी आवश्‍यक ते सर्व उपाय आम्ही योजत आहोत. करोना रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. येथील आरोग्य व्यवस्थाही उत्तम राखण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी नमूद केले.

शहरात कितीही प्रमाणात रूग्ण वाढले तरी त्यांच्यासाठी बेड्‌स कमी पडणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासगी रुग्णालयातील आयसीयू बेड्‌स वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला, पण दुर्दैवाने हायकोर्टाने आमच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

आम्ही आता त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. दिल्लीत मंगळवारी एकाच दिवसात करोनाचे 6700 रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण करोना बाधितांची संख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. दिल्लीत करोनामुळे एकूण 6652 लोक दगावले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.