पुणे – करोनाच्या लाटांची पुनरावृत्ती होत असते. लाट येते तिचा उच्च बिंदू गाठल्यानंतर परत ती ओसरते. आज भारताच्या तुलनेत पाश्यात्य देशांमध्ये काय घडते आहे याचा अंदाज घेतला तर तिथे तीसरी आणि चौथी लाटदेखील आल्याचे निदर्शनास येते. भारतातदेखील ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत वर्तविण्यात येत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यानी मत व्यक्त केले.
सृष्टी संस्थेतर्फे “करोना… आज, उद्या आणि पुढे? याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. भोंडवे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजूमदार हे होते.
यावेळी डॉ. भोंडवे म्हणाले, करोनाचे म्युटेशन होऊन हा विषाणू दिवसेंदिवस मानवजाती समोर नव-नवीन आव्हांने उभी करीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून प्रत्येक देशांतील सरकार एकमेकांशी माहितीचे आदान-प्रदान करून समन्वयाने या महामारीचा सामना करत आहे.
प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रबोधन या दोन्ही पातळींवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. लॉकडाऊन हा या महामारीवरील अंतीम उपाय होऊ शकत नाही. लॉकडाऊनकडे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाहण्याऐवजी त्याच्याकडे वैद्यकीय दृष्टीकोनातून पाहिले गेले पाहिजे, असे डॉ.भोंडवे यांनी सांगितले.