पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा म्हणजे ज्येष्ठ आणि को-मॉर्बिड (45 वर्षे वयावरील आजारी व्यक्ती) यांच्या लसीकरण मोहिमेला सोमवारपासून सुरूवात होणार असून, त्यासाठी तयार केलेल्या खास ऍपचे प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांना रविवारी देण्यात आले. या नंतर ते खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींना तसेच जिल्हास्तरावरील सरकारी प्रतिनिधींना देण्यात येणार आहे.
“को-विन 2.0′ असे हे ऍप तयार करण्यात आले असून, यामध्ये माहिती कशी भरायची वगैरे माहितीचा प्रशिक्षणात समावेश करण्यात आला आहे. लसीकरणाची तारीख जरी दि. 1 मार्च दिली असली, तरी प्रत्यक्षात लसीकरण सुरळीत होण्याला एक आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.
मागील वेळेचा अनुभव पाहता को-विन ऍप आणि अन्य समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेल्थकेअर आणि फ्रंटलाइनवर्कर्सची संख्या सिमित होती. मात्र, आता लसीकरण मोठ्या समूहासाठी होणार असून, एकप्रकारे ते आता “ओपन टू ऑल’ या टप्प्यात जाणार आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्या वाढणार आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने ऍपचे स्वरूप ठेवले असण्याची शक्यता आहे. याशिवाय हे ऍप ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना उघडून त्यात वैयक्तिक माहिती सहज भरता येणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीनेच ते बनवण्यात आले आहे.
राज्याला मिळाला 11 लाख 56 हजार 500 लसींचा कोटा
तिसऱ्या टप्प्यासाठी राज्याला 11 लाख 56 हजार 500 लसींचा कोटा मिळाला असून, राज्याच्या लसीकरण विभागाकडून तो संपूर्ण राज्यात वितरित करण्याच्या कामाला सुरूवातही झाली आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणेच जिल्हा स्तरावर लस पाठवून त्यांच्या शीतपेट्यांद्वारे ती तालुका, गाव स्तरावर पाठवण्यात येणार आहे.
या आजार असलेल्या व्यक्तींना लस मिळणार
– श्वसनक्रियेशी संबंधित ऍटॅक, हालचाल करण्यासाठी जास्त गरज असणारे दिव्यांग आणि बहिरेपणा अंधत्व यासह विविध अपंगत्व असलेले
– गेल्या वर्षापासून हृदय निकामी झालेले आणि उपचार सुरू असलेले
– हृदय प्रत्यारोपण, हृदयामध्ये उपकरण बसवलेले असल्यास
– हृदयाचा एलव्हीईएफ आजार
– हृदयाचा साधारण किंवा तीव्र व्हॉल्वचा आजार,
– जन्मजात हृदयविकार, अँजिओप्लास्टी, बायपास, उच्च रक्तदाब, मधुमेह असणारे
– अँजिना या हृदयविकारासह उच्च रक्तदाब, मधुमेह असणारे -पल्मोनरी आर्टरी डिस्फंक्शन, पक्षाघात
– दहा वर्षे जुना मधुमेह किंवा गुंतागुंतीच्या मधुमेहासह उच्च रक्तदाब असलेले
– किडनी, यकृत, स्टेम सेल ट्रान्सप्लांट चे प्रत्यारोपण झालेले किंवा वेटिंगवर असलेले रुग्ण
– शेवटच्या टप्प्यातील किडनीविकार, कॅन्सर, थॅलेसेमिया आजार असलेले
– कालांतरापासून स्टीरॉइड घेत असलेले, प्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी औषधे घेणारे
– लिव्हर सिरॉसिस, तीव्र श्वसनविकार, कॅन्सरग्रस्त (लिम्फोमा, ल्युकेमिया, मायलोमा)
– 1 जुलै 2020 नंतर झालेला कॅन्सर किंवा कॅन्सर थेरपीवर असणारे
– सिकल सेल डिसीज, बोन मॅरो फेल्युअर, ऍनेमिया, थॅलेसेमिया
– एचआयव्ही, बौद्धिक कमतरता असणारा आजार, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी