‘त्या’ ट्रकचालकाच्या विरोधात तिसरा गुन्हा

तेलाचे डबे आणि सिमेंटच्या गोण्याही चोरी करून विकल्या 

पिंपरी – ट्रकचालक त्याच्या ट्रकमध्ये भरलेला माल परस्पर चोरून त्याची विक्री करायचा. हा प्रकार मागील आठवड्यात उघडकीस आला.त्यानंतर आठवडाभरात त्याच्या विरोधात मालाची चोरी करून परस्पर विक्री केल्याचे तीन गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी त्या ट्रकचालक चोरट्याला अटक केली. 

सुरेश प्रकाश राजोळे (वय 25, रा. चिंबळी फाटा. मूळ रा. तिरुपटेलवाडी, जि. लातूर) असे अटक केलेल्या ट्रकचालक आरोपीचे नाव आहे. पहिल्या घटनेत ट्रकचालक चोरट्याने ट्रकमधील 160 टायर चोरी केले. प्रदीप सोमदत्त शर्मा (वय 34, रा. मोशी) यांनी पहिल्या प्रकणात 160 टायर चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. आरोपी चालकाने भोसरी येथे कंटेनर थांबवून 160 टायर चोरले.

दुसऱ्या प्रकरणात मनोजकुमार काकासाहेब शिंदे (वय 34, रा. भेकराईनगर, हडपसर) यांनी आरोपी सुरेश याने 112 तेलाचे डबे चोरल्याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी शिंदे आणि आरोपी राजोळे हे दोघेही चालक आहेत. त्यांनी खोपोली येथील कंपनीमधून 20 टन वजनाचे तेलाचे डबे शिंदे यांनी आरोपी राजोळे याच्या ट्रकमध्ये भरून दिले. भोसरी परिसरात आरोपीने एक लाख 68 हजार रुपये किमतीचे 1 हजार 680 किलो वजनाचे 112 तेलाचे डबे परस्पर चोरी करून विकले.

तिसऱ्या प्रकरणात पियुष भूपेंद्र त्रिवेदी (वय 40, रा. कोंढवा, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुरेश प्रकाश राजोळे हा 2 ऑगस्ट रोजी फिर्यादी त्रिवेदी याच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. दिघी येथील मॅगझिन चौकातून आळंदी रोडने जात असताना ट्रकमधील डिलिव्हरीसाठी भरलेल्या एक लाख 10 हजार 400 रुपयांच्या 400 सिमेंटच्या गोण्या चोरून नेल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.