मुंबई : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु असतानाच आज तिसऱ्या आघाडीने सुद्धा रणशिंग फुंकले आहे. या तिसऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असे नाव देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्यासाठी चाचपणी सुरू होती. त्याला आज मूर्त स्वरूप आले आहे. आज तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तिसरा पर्याय देण्याविषयी मंथन करण्यात आले.
बैठक पार पडल्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेत बैठकीचा तपशील सांगितला. सुसंस्कृत महाराष्ट्राला तिसरा पर्याय देत असल्याचे सांगितले. या परिवर्तन महाशक्तीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परिवर्तन मेळाव्यामध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं तोपर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले. परिवर्तन महाशक्तीमध्ये राज ठाकरे, मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राजू शेट्टी यांनी सांगितले की, परिवर्तन महाशक्तीमध्ये सामूदायिक नेतृत्व असेल. समन्वय समिती करू ते सर्व निर्णय घेईल. 26 सप्टेंबरपर्यंत ज्यांना यात यायचे आहे त्यांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले. सामान्य माणसाला पर्याय म्हणून काम करू, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ चरित्र स्वच्छ चेहरा देण्याचे आमची कल्पना आहे, परिवर्तन महाशक्तीमध्ये ज्यांना यायचं आहे त्यांनी यावे, असे त्यांनी सांगितले.