पुणे- मराठेशाहीचा इतिहास हा जसा संस्कृती,परंपरांचा, अभिमानाचा आहे तसाच तो शूरांचा, शौर्याचा आणि त्यांच्या बेधडक साहसाचा सुद्धा आहे. आता हाच इतिहास लवकरच शिवप्रेमींच्या भेटीला येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. ज्यांना कश्याचीही भीती नव्हती, जोवर आपला राजा बरोबर आहे. तोवर आपण मोठी मजल मारू शकतो हे जणू त्यांनी मनावर बिंबवून घेतलंच होतं.
या भावनेतून त्यांनी रचलेल्या शुर पराक्रमाच्या गाथांमधून उभं राहीलं हिंदवी स्वराज्य! हिंदवी स्वराज्याच्या अश्या या शूर मावळ्यांचा मागोवा घेण्यासाठी आणखी एक इतिहासातील सोनेरीपान उलगडण्याची वेळ आली आहे.
जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर “बहिर्जी नाईक’ अशा या शूर, धाडसी, विश्वासू शिलेदाराची गाथा लवकरच ‘बहिर्जी स्वराज्याचा तिसरा डोळा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे.
‘काक माय एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन अंतर्गत निर्माती मंदाकिनी किशोर काकडे या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा देत आहेत. शिवाजी महाराजांच्या या थोर मावळ्याचा जीवनप्रवास आणि स्वराज्यनिर्मितीमधील त्याचे योगदान या चित्रपटातून समोर येणार आहे.