मनोरंजन क्षेत्राला “ऑनलाइन’ची जोड घ्यावी लागणार
पुणे – लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक क्षेत्रालाही फटका बसला आहे. आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सरकारने चित्रपट-मालिकांचे शूटिंग सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, मनोरंजन क्षेत्र पूर्वपदावर येत असतानाच येत्या काळात “ऑनलाइन’ची जोड घ्यावी लागणार असल्याचे मत दिग्गज व्यक्त करतात.
कलावंत, तंत्रज्ञांना शारीरिक अंतर ठेवत, योग्य खबरदारी घेऊनच शूटिंग करावे लागणार आहे. शूटिंग सुरू झाल्यास कलाकारांच्या बरोबरीने, विशेषत: पडद्यामागचे कलाकारांचे आर्थिक चक्र सुरू होण्यास मदत होणार आहे. मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण करताना कलाकार, तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक आहे. कॅमेरा, ट्रॉली, माइक्स हाताळतानादेखील विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. याशिवाय शुटिंगबाबत जाहीर केलेल्या नियमावलीनुसार “सेट’वर असणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत आणि कामाच्या पद्धतीमध्ये बदल करावे लागणार आहेत.
करोनाचा नाटक, चित्रपट आणि लोककला या प्रमुख तिन्ही माध्यमांवर परिणाम होणार आहे. जरी शूटिंग होऊन चित्रपट प्रदर्शित झाले किंवा नाटकांची निर्मिती झाली, तरी प्रेक्षागृहात प्रेक्षक येण्याची शक्यता कमी आहे. अंतिम टप्प्यात आणि प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चित्रपटांना आर्थिक फटका बसला आहे. येत्या काळात “ओटीटी प्लॅटफॉर्म’वरील प्रेक्षकांच्या संख्येत नक्कीच वाढ होणार आहे.
– मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ