सरकार पडण्याच्या गोष्टी म्हणजे कार्यकर्त्यांना दाखवलेले गाजर

कराड – विरोधकांना कार्यकर्ते आपल्यासोबत राखायचे असल्याने महाविकास आघाडीचे सरकार पडणार, असे वारंवार म्हणावे लागते आहे. त्यांच्या आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये, म्हणून महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची चर्चा भाजप नेते करत आहेत. हे म्हणजे कार्यकर्त्यांना दाखवलेले गाजरच आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची खिल्ली उडवली. शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांचे आशीर्वाद महाविकास आघाडीला जोपर्यंत आहेत, तोपर्यंत हे सरकार कोणीही पाडू शकत नाही, असा विश्‍वासही ना. पवार यांनी व्यक्‍त केला. 

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ते प्रीतिसंगमावरील समाधिस्थळी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकात शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. ना. पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे. आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.

हे सरकार मजबुतीने उभे आहे. 1995 मध्ये आमचे 80 आमदार असूनही तेव्हा आम्ही विरोधात होतो. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरावे लागते. तेच काम आता भाजपचे नेते करत आहेत. सरकारमधील मंत्री सतत स्वप्ने पाहतात, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करत आहेत. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ना. पवार म्हणाले, आम्हाला स्वप्नं पडतात, असे चंद्रकांत पाटील यांना कुणी सांगितलं? आम्ही स्वप्नं पाहत नाही तर कृती करणारी माणसे आहोत.

 

केंद्र सरकाकडून दुजाभाव
वाढीव वीज बिलांबाबत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना ना. पवार म्हणाले, महावितरणची थकबाकी 59 हजार कोटी रुपये आहे. मागील सरकारमुळे महावितरण कंपनी अडचणीत आली आहे. करोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. केंद्र सरकारकडून 29 हजार कोटी रुपये येणे आहेत. मुख्यमंत्र्यांनी वारंवार पत्र पाठवूनही दखल घेतली जात नाही. दहा वर्षांपूर्वी डॉ. मनमोहनसिंग व शरद पवार यांनी केंद्राकडून राज्याला त्वरित मदत दिली होती. त्यांनी सर्व राज्यांना समान न्याय दिला होता. आताच्या सरकाकडून ते होत नाही.

सरकार बनवू शकले नाहीत, हेच दुखणे
आधी करोना आला. नंतर अतिवृष्टी झाली. त्यानंतर चक्रीवादळ आले. या संकटांमधून मार्ग काढत सरकार स्थिर होत आहे. महत्त्वाच्या विषयांवर आम्ही एकत्र आहोत; परंतु 105 आमदार असतानाही भाजपला सरकार बनवता आले नाही, हेच त्यांचे खरे दुखणे आहे, असा टोलाही ना. पवार यांनी लगावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.