जनावरे चोरणारी टोळी बारामतीत गजाआड

निरावागज ग्रामस्थांची सतर्कता : दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी
बारामती -निरावागज ग्रामस्थांच्या मदतीने जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी गजाआड केले आहे. यात चोरीच्या दोन शेळ्या व एक बोकड पोलिसांनी हस्तगत केले आहे.
अजय फकिरा तालीकोटी, फकिरा भिमाप्पा तालिकोटी, दुर्गाप्पा रामाप्पा कल्याणी (तिघे रा. कोल्हापूर), गणेश दुर्गाप्पा शिपरे (रा. बेळगाव), अर्जुन लखुडे, नागराज कमजन (रा. हुबळी), अनील बोडरे व आकाश भोसले (दोघे रा. आसू, ता. फलटण), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अविनाश जाधव (रा. आसू) व गणेश नावाचा हुबळीत राहणारा अन्य एक आरोपी पळून गेला आहे. याप्रकरणी राजेंद्र पवार यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शनिवारी (दि. 21) मध्यरात्री टोळीला निरावागजमध्ये पकडण्यात आले. त्यांच्या चारचाकी वाहनातून तीन शेळ्या व एक बोकड हस्तगत केले. फिर्यादीसह निरावागजमधील अमोल कुंभार व राहुल कुंभार यांच्याकडील शेळ्या, बोकडांची चोरी करण्यात आली होती. फिर्यादी व अन्य ग्रामस्थ शनिवारी रात्री निरावागजमधील ठेंगलवस्ती येथे गस्तीसाठी जमले होते. त्यावेळी एक नंबर नसलेली गाडी तेथून जाताना दिसली.
त्यांच्यासोबत एक क्रमांक नसलेली दुचाकी होती. वाहनांमध्ये नऊ ते दहा लोक दिसले. त्यामुळे ग्रामस्थांचा संशय बळावला. या भागातील शेळ्या, मेंढ्या, बोकड, गाई, म्हशी चोरीला जात आहेत. त्यामुळे जनावरे चोरी करणारी ही टोळी असावी असा अंदाज आल्याने ग्रामस्थांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दुचाकीवरील दोघेजण पळून गेले.
गाडीत पाहिले असता त्यात जनावरांना बांधण्यासाठीचे दोर, वागरा व फळ्या दिसल्या. त्यामुळे हे चोरटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, असता त्यांनी प्रतिकार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू आक्रमक ग्रामस्थांनी त्यांना मारहाण करत ताब्यात घेतले. तालुका पोलीस ठाण्याला घटनेची खबर देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी टोळीला ताब्यात घेतले.





