मारूल हवेली येथील घटना; भीतीचे वातावरण
पाटण – आईचे काळीज काय असते याची प्रचिती बुधवारी आली. मारूल हवेली येथील ऊसाच्या फडात सापडलेले बिबट्याचे पिल्लूू मादीने अलगद उचलून नेले. हा मातृप्रेमाचा थरार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी अनुभवला.
मारुल हवेली, ता. पाटण येथील इनाम नावाच्या शिवारात बुधवार दि. 13 रोजी ऊसतोड सुरू होती. दुपारी 2 वाजता येथील ऊसतोड कामगारांना फडात बिबट्याचे एक पिल्लू आढळून आले. ते अत्यंत लहान असल्याने त्याचा जन्म काही दिवसांपूर्वीच झाला असण्याची शक्यता होती.
त्यामुळे मादी बिबट्या येथेच जवळपास असण्याची शक्यता असून तो केंव्हाही हल्ला करू शकतो, या भितीने ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाला याची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी विलास काळे, वनरक्षक रमेश कदम हे वन कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले. सापडलेल्या पिल्लाला त्याच ठिकाणी ऊसाच्या पाचटातच घुमट तयार करुन ठेवले.
सायंकाळी सहानंतर हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला. वनविभागाचे कर्मचारी या पिल्लावर लक्ष ठेवून होते. सायंकाळी बरोबर सातच्या सुमारास बिबट्या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज येताच मादी बिबट्या ऊसातून बाहेर आली. ऊसाची पाचट बाजुला करत पिल्लाच्या मानेच्या पाठीमागील भाग तोंडात धरून निघून गेली. हा सर्व थरार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थानी अनुभवला.
दरम्यान, मारुल हवेली विभागातील पापर्डे, दिवशी बुद्रुक, कोरिवळे, टेळेवाडी आदी गावांच्या डोंगर परिसरासह गांधीटेकडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे घटनेतून स्पष्ट झाले आहे. वन विभागाने या विभागात तातडीने पिंजरा लावण्यासह गस्त घालण्याची मागणी केली आहे.
मारूल हवेली येथील इनाम शिवारातील ऊसाच्या फडात बिबट्याचे पिल्लू आढळून आले. हे पिल्लू मादीने सुखरूप परत नेले आहे. त्यामुळे मादी बिबटया चवथाळण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे मादीकडून हल्ला होण्याचा धोका टळला आहे.
विलास काळे वन परिक्षेत्र अधिकारी पाटण