नवी दिल्ली : आयएनक्स मीडियाचे प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी दिलेल्या साक्षीमुळे चिदम्बरम अडचणीत आले असून त्यांच्या साक्षीमुळेच चिदम्बरम यांना अटक झाल्याची जोरदार चर्चा आहे. शिना बोरा हत्याप्रकरणात अटक असलेल्या इंद्राणी मुखर्जी यांच्या साक्षीने चिदम्बरम यांच्या अटकेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने म्हटले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने चिदम्बरम यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात देखील इंद्राणी मुखर्जींनी दिलेल्या साक्षीचा उल्लेख केला आहे. तर, इंद्राणी मुखर्जी यांच्या साक्षीच्या आधारेच पी. चिदम्बरम यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांची चौकशी ईडीने केली होती. त्यावेळी इंद्राणी मुखर्जीने दिलेल्या माहितीनुसार, आयएनएक्स मीडियाच्या प्रकल्पाला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची मंजुरी मिळत नव्हती. त्यामुळे याबाबत नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात मुखर्जी दाम्पत्याने त्यावेळचे अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची भेट घेतली होती. पीटर मुखर्जी यांनी चिदम्बरम यांच्याशी संवाद साधला. तेव्हा माझ्या मुलाला व्यापारात मदत करा, असे चिदम्बरम यांनी सांगितले. त्यावेळी चिंदबरम यांनी किती रकमेची लाचेची मागणी केली होती हे मात्र इंद्राणी मुखर्जीने सांगितले नव्हते. त्यानंतर दिल्लीतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये कार्ति चिदम्बरमला मुखर्जी दाम्पत्य भेटले होते. तेव्हा आयएनएक्सचा तिढा सोडवण्यासाठी चिदम्बरम यांचे पुत्र कार्तीने 10 लाखांची लाच मागितली होती. तसेच त्याच्या विदेशी बॅंकेतील खात्यात ही रक्कम जमा करावी अशी विनंती ही केली होती. तसेच ही रक्कम जमा करण्याचे इतरही मार्ग सुचवले होते, अशी साक्ष इंद्राणी मुखर्जीने दिली होती. इंद्राणीची हीच साक्ष आता चिदम्बरम यांना महागात पडताना दिसत आहे.