निर्णयाचीही “परीक्षा’!

"सीईटी'च्या तारखा जाहीर होईनात ः विद्यार्थ्यांना टेंशन

व्यंकटेश भोळा
पुणे –
विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्यासंदर्भात अद्याप निर्णय होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.
त्यानंतर आता राज्य सरकारने विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखाही अद्याप जाहीर केल्या नाहीत. यंदा सीईटीशिवाय प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी शिक्षणसंस्थांचा दबाव वाढत असतानाच यावर्षी सीईटी होणार की नाही, अशा दुहेरी संकटात विद्यार्थी सापडले आहेत.

सर्वच बोर्डाच्या बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. राज्य सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी “एमएचटी-सीईटी’ परीक्षा घेतली जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश निश्‍चित केले जातात. मात्र, अद्यापपर्यंत सीईटीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. दि.5 मे रोजी होणारी ही सीईटी करोना संकटामुळे यापूर्वी दोनवेळा पुढे ढकलली गेली आहे. बारावी निकालानंतर सीईटी कधी होणार, याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकारकडून परीक्षेच्या तारखा जाहीर
देशातील आयआयटी, एनआयटी, प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावरून जेईई मेन परीक्षा घेतली जाते. ही परीक्षाही करोनामुळे पुढे ढकलली. आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जेईई मेन परीक्षा 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. मेडिकल प्रवेशासाठी “नीट’ परीक्षा 13 सप्टेंबर रोजी असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सीईटी आवश्‍यक
राज्यातील एमएचटी-सीईटी प्रवेशासंदर्भात तीन-चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सीईटी अनिवार्य केली आहे.
त्याशिवाय प्रवेशप्रक्रिया राबवू नका, असे सक्‍त निर्देश राज्य सरकारला दिले. अशा परिस्थितीत करोनाचे संकट उभे असतानाही सीईटी घेणे राज्यावर बंधनकारकच आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी सीईटी घेणे आवश्‍यक आहे, असे बहुतांश शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
करोनामुळे यंदा सीईटी नको
पुण्यासह राज्यभरातील शिक्षणसंस्थांनी करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा सीईटी न घेता बारावीच्या गुणावर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया राबवा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली. सीईटी न घेतल्यास प्रवेशप्रक्रिया जलद व सुलभ पद्धतीने होईल, असे शिक्षणसंस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा सीईटी नकोच, असा शिक्षणसंस्थांचा आग्रह आहे. या माध्यमातून सीईटी घेण्यावरून राज्य सरकारवर अप्रत्यक्ष दबाव आणला जात आहे.
विद्यार्थी चिंतातूर
एमएचटी-सीईटी अजूनही नाही. अजून किती काळ अभ्यास करायचा, या विचाराने विद्यार्थी व पालक मानसिकदृष्ट्या थकले आहेत. त्याचा परिणाम सीईटीवर अर्थात गुणांवर होणार आहे. सीईटी कधी होणार आहे, याविषयी काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. अशा परिस्थितीत एकदाचे सीईटीचे ठरवा आणि आम्हाला तणावातून मुक्‍त करा, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटीचा अजून कोणताच निर्णय झालेला नाही. ही सीईटी कधी होणार आहे, याविषयी आताच सांगता येणार नाही.
– संदीप कदम, आयुक्‍त, राज्य सीईटी सेल

केंद्र सरकारने जेईई मेन्स, जेईई ऍडव्हान्स, नीट यांच्या तारखा जाहीर केल्या. त्याच धर्तीवर राज्य सरकारने “सीईटी’च्या तारखा जाहीर करणे आवश्‍यक आहे. शासनाचे धोरण स्पष्ट नसल्याने गोंधळ वाढत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे.
– प्रा. दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीएन्स प्रशिक्षण केंद्र

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.