पुणे – खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये केलेल्या करोना संदर्भातील स्वॅब टेस्टिंग “आयसीएमआर’च्याच नियमानुसार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी प्रयोगशाळेतील आणि “आयसर’ या संस्थांमधील तज्ज्ञांनी पाहणी केली असता खासगी लॅबमध्ये कोणताही गैरप्रकार आढळला नाही. त्यामुळे वाढणारी बाधितांची संख्या म्हणजे करोनाची तीव्र लाट, असल्याचाच निष्कर्ष निघत आहे.
खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये केलेल्या करोना संदर्भातील स्वॅब टेस्टिंगमधीलच बाधितांची संख्या कशी काय जास्त दिसते? असा प्रश्न महापालिकेच्या आरोग्य विभागाला पडला होता. त्यामुळे गेल्या गुरूवारी या लॅबचालकांची बैठकही महापालिकेत घेण्यात आली. याला सरकारी तपासणी संस्थांचे तज्ज्ञही उपस्थित होते.
सध्या 22 ते 23 खासगी लॅब आहेत. शहरात एकूण 10 हजार स्वॅबटेस्ट घेतल्या असतील तर त्यातील आठ हजार स्वॅब केवळ खासगी लॅबमध्ये घेतले जातात आणि त्याची चाचणी केली जाते.
महापालिकेच्या स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये केवळ दोन अडीच हजार स्वॅब कलेक्शन केले जाते. टेस्टिंग खासगीमध्ये जरी जास्त होत असले तरी त्यांच्या तपासणीत बाधितांची संख्याही जास्त येत आहे.
एकूण बाधितांमध्ये खासगी लॅबमध्ये टेस्ट केलेल्या बाधितांची संख्या जास्त आहे. एवढी बाधितांमधील वाढ कशी झाली, लॅब वाल्यांची “टेस्टिंग मेथड’ बरोबर बरोबर आहे ना, त्यांच्याकडून वापरले जाणाऱ्या किटमध्ये काही प्रॉब्लेम नाहीत ना यिां सगळ्यांची माहिती या बैठकीत विचारण्यात आली होती.