श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी झालेल्या चकमकीत ठार झालेले हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना करोनाची लागण झाली होती, असे निष्पन्न झाले आहे. या दहशतवाद्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या तपासणीच्या अहवालात या दोन्ही दहशतवाद्यांना करोनाची लागण झाली होती, असे निष्पन्न झाले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांपैकी एक विदेशी दहशतवादी होता. त्याचे नाव अली भाई उर्फ हैदर असे होते. तर दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटू शकलेली नाही.
कुलगाम जिल्ह्यातील अराह भागात शनिवारी झालेल्या चकमकीमध्ये हे दोन्ही दहशतवादी ठार झाले होते. या चकमकीदरम्यान लष्कराचा एक जवानही जखमी झाला होता. कायदेशीर वैद्यकीय तपासणीसाठी या दोन्ही दहशतवाद्यांचे नमुने घेऊन कोविड-19 चाचणीसाठी श्रीनगरमधील सीडी हॉस्पिटलला पाठवून देण्यात आले होते. आज या चाचणीचे रिपोर्ट मिलाले. त्यामध्ये या दोघांनाही करोनाची लागण झालेली होती, असे निष्पन्न झाले.
कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह विशेष शववाहिनीतून बारामुल्ला इथे नेण्यात येतील आणि तेथे त्यांचे दफन केले जाईल, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. करोनाची साथ पसरलेली असल्यामुळे दहशतवाद्यांच्या मृतदेहांचे दफन स्वतंत्र ठिकाणी केले जाणार आहे.