कोल्हापुरात उन्हाच्या झळा वाढल्या : कोल्हापूरच तापमान जवळपास 42℃

कोल्हापूर – कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या तापमानात वाढ सुरूच आहे. आज शहरात पार्‍याची उसळी कायम असल्याने तापमान जवळपास 42 अंश सेल्सियस पर्यंत पोहचले. अंगाची लाहीलाही करणार्‍या या उष्म्याचा लोकांना तडाखा बसत आहे. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आजही सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सकाळपासून असलेली ही परिस्थिती सायंकाळनंतरही कायम होती. हवेतील उष्मा कमालीचा वाढल्याने उकाडा असह्य होतोय . सकाळपासूनच डोक्यावर टोपी, रूमाल घालावा लागत होता. अनेक जण छत्र्या घेऊन घराबाहेर पडले होते. वाढत्या उष्म्याने शीतपेये, उसाच्या, फळांच्या रसाची मागणी वाढली होती. बाजारात बर्फाच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. ताक, कोकम, सोलकढी, लस्सी विक्रीच्या हातगाड्यांवर मोठी गर्दी दिसत होती. शहरातील बागा दुपारी गर्दीने फुलून जात आहेत. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता इतकी जाणवत आहे की, अनेक जण घराबाहेर पडण्याचेही टाळत आहेत. उन्हाने वाहने तापत असल्याने वातानुकूलित यंत्रणा नसलेल्या अनेकांनी दुपारी वाहने रस्त्यावर आणण्याचे टाळले.आज शहरात जवळपास 42 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. यावर्षीच्या सर्वाधिक तापमानाची दररोज नोंद होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर या उन्हाचा आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.