नगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सतांची पावनभूमी आहे. या भूमित संतांची दिलेली शिकवण व त्यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी ठरले. तीच चांगली प्रेरणा कामी येत असल्याचे विचार नगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी व्यक्त केले.
नगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनतर्फे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतूक अधिकारी दादा महाजन, यंत्र अभियंता दिलीप जाधव, अविनाश कलापुरे, नितीन आढाव, देविदास काळे, मनोज खेडकर, किरण रास्कर, प्रदीप गाडळकर, अतुल तोटे, मनोज सुगंधे आदी यावेळी उपस्थित होते.
नगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले. नागरिकांच्या दळवळणाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या या सेवेकऱ्यांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम केल्याचे गाडळकर म्हणाले.
विभाग नियंत्रक गिते यांनी केमिस्ट असोसिएशनचे आभार मानले. राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाची आहे. ती आम्ही घेतच आहोत. परंतु केमिस्ट असोसिएशनने आपली सामाजिक बांधिलकी म्हणून कर्मचाऱ्यांसाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केल्याने आरोग्याची अधिक काळजी घेता येईल, असे ते म्हणाले.