नगर – शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी विकास मंडळाची जागा जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची आहे. त्यावर कुणा एका व्यक्तीचा अथवा मंडळाचा अधिकार नाही. असे असताना जिल्ह्यातील शिक्षकांना विश्वासात न घेता विकास मंडळाच्या नूतन इमारतीची निविदा परस्पर दिली गेली. ही निविदा चढ्या भावाने दिली असून ठेकेदार हा बॅंकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांचा निकटवर्तीय आहे. यासाठी शिक्षक बॅंकेतून सत्त्याऐंशी लाख रूपयांच्या ठेवी वर्ग करून घेण्यात आल्या. आता पुन्हा शिक्षक बॅंकेच्या अहवालात प्रत्येक शिक्षकाची दहा हजार रूपये ठेव घेणेबाबत शिफारस केलेली आहे.
विकास मंडळाची वास्तू उभी करणेसाठी शिक्षक बॅंकेच्या ठेवी वर्ग करून बॅंकेचे अस्तित्व धोक्यात आणणे चुकीचे आहे. इमारत कधी पूर्ण होणार आहे, तिच्यातून किती उत्पन्न मिळणार आहे, शिक्षकांची ठेव परत कशी व कधी मिळणार आहे याचा कुठलाही तपशील विकास मंडळाने दिलेला नाही. विकास मंडळाकडे यापूर्वी वर्ग केलेली ठेव पुन्हा वसुल करून घेण्याचा ठराव शिक्षक बॅंकेच्या संचालक मंडळाने केला आहे. असे असताना पुन्हा प्रत्येक सभासदाला दहा हजार रूपये ठेव वर्ग करण्याची सक्ती का ?असा सवाल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, यांनी केला आहे.