करांचे ओझे परवडत नाही

टोयोटो कंपनीने थांबविला विस्तारीकरणाचा कार्यक्रम 

बंगळुरू – भारतात वाहनावर गरजेपेक्षा जास्त कर आहेत. सरकारला वाहन कंपन्या देशात नको आहेत असा यातून अर्थ काढला जाऊ शकतो, असे टोयोटो कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीत कंपनीने विस्तारीकरणाचा कार्यक्रम थांबविला असल्याचे म्हटले आहे. 

टोयोटो कंपनीचे उपाध्यक्ष शेखर विश्‍वनाथन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्ही भारतामध्ये बऱ्याच वर्षांपासून चांगले काम केले आहे. त्यामुळे आमच्या जागतिक व्यूहरचनेत भारताला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, भारतातील वाहनावरील कर मद्य किंवा तंबाखूवरील करापेक्षा जास्त आहेत. यामुळे कंपन्याबरोबरच ग्राहक दुरावतात. अशा परिस्थितीत अधिक गुंतवणूक करणे अकिफायतशीर ठरते, असे त्यांनी सूचित केले.

लॉकडाऊनमुळे विविध उद्योगांवर परिणाम झाला असतानाच भारत सरकारने आत्मनिर्भर धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत छोट्या आणि इतर उद्योगांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. भारत सरकारने केलेले हे काम स्वागतार्ह आहे. मात्र, वाहन उद्योगाने बऱ्याच दिवसापासून काही मागण्या सरकारकडे केल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

केंद्र सरकार वाहन उद्योगाच्या अडचणी सोडवणार आहे की नाही याबाबत केंद्र सरकारकडून कसलेही संकेत मिळत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. दुचाकी आणि इतर वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी या उद्योगाने सरकारकडे अनेक वेळा केली आहे. सरकारकडून कर कमी करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत निश्‍चित असे वेळापत्रक जाहीर केले जात नाही. यामुळे या क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या नाराज आहेत. मारुती सुझुकी या भारतातील सर्वात मोठ्या कार कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनीही गेल्या आठवड्यात वाहन क्षेत्रावरील कर कमी करण्यास सांगितले आहे.

भारतातील रोजगार अबाधित ठेवणार
सध्या कंपनी विस्तारीकरणाचे काम काही प्रमाणात थांबविणार असली तरी भारतात या कंपनीचे अगोदरच मोठ्या प्रमाणात काम आहे. ही कंपनी भारतातील ग्राहकांना वाहन पुरविण्याबरोबरच निर्यातही करीत आहे. ते काम व्यवस्थित चालू ठेवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतात कंपनीने केलेली रोजगारनिर्मिती अबाधित ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.