पाटणला मासिक सभेत शिक्षण सभापतीच टार्गेट

ढेबेवाडी विभागात शिबेवाडी येथील विद्युत तार तुटून तात्यासाहेब कदम यांचा शॉक लागून मृत्यू झाला. त्याला जबाबदार वीज मंडळ आहे. या व्यक्तीना तात्काळ मदत मिळावी व सविस्तर अहवाल मिळावा अशी मागणी देसाई यांनी केली.

पाटण  – पाटण तालुक्‍यातील प्राथमिक शाळांचा दर्जा का खालावला असून शिक्षक कामचुकारपणा करत आहेत. यावर भाग शिक्षण विस्ताराधिकारी यांच्या घेतलेल्या उलट तपासणीत एका विस्ताराधिकारी पंचायत समितीचे सभापती आणि जिल्ह्याचे शिक्षण सभापती यांनाच टार्गेट केल्याने सभेत खळबळ उडाली.

सभापती उज्ज्वला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी उपसभापती राजाभाऊ शेलार, गटविकास आधिकारी मीना साळुंखे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभूते यांची उपस्थिती होती. शिक्षण विभागाच्या चर्चेवेळी संतोष गिरी सुरेश पानस्कर या सदस्यांनी तालुक्‍यातील खासगी शाळा आणि बोंद्री येथील धोकादायक शाळेची इमारत हा विषय उचलून धरला होता.

त्यावर गटशिक्षणाधिकारी यांचा अंकुश नाही असा आरोप करण्यात आला. मग शिक्षण विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख हे शाळांना भेटी देत नाहीत, शाळांचे शिक्षक कामचुकारपणा करतात अशी तक्रार केली. त्यावर संमत होऊन उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी सभेत हजर असणाऱ्या भाग शिक्षण विस्ताराधिकारी यांचा आढावा घेतला. या दरम्यान कामचुकार शिक्षकांवर आपण काय कारवाई केली हे सविस्तर सांगा असे त्यांना सुनावले. त्यावर शिक्षण विस्तार अधिकारी प्रशांत आरबाळे यांनी शिक्षकांवर कारवाई करताना आमच्यावर राजकीय दबाव येतो.

याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी मी सभापती आणि शिक्षण सभापती यांच्याकडे तक्रार केली. त्यावर त्यांनी काही न करता कानाडोळा केला असा गौप्यस्फोट केला. त्यामुळे उपसभापती राजाभाऊ शेलार हे संतप्त झाले. तुम्ही वर्षभरात कितीजणांना भेटी दिल्या आणि काय काम केले याचा आढावा द्या त्यानंतर सदस्य संतोष गिरी यांनी यावर पडदा टाकत भाग विस्तार अधिकारी यांची बाजू धरली.

पंचायत समितीच्या शेष फंडातून तालुक्‍यातील पूरग्रस्तांना मदत करा अशी सूचना संतोष गिरी व पंजाबराव देसाई यांनी केली. याबाबत राजाभाऊ शेलार, बबन कांबळे, प्रतापराव देसाई यांनी सांगितले की आम्ही वैयक्तिक मदत पूरग्रस्तांना केलेले आहे. शेष फंडातून मदत करण्याची आवश्‍यकता नाही. यावरून दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

निगडे आणि कोयना विभागातील गोठणे येथे एसटी सेवा सुरू करण्याबाबत पाटण आगाराला पत्र देऊनही अद्याप दखल घेण्यात आलेली नसल्याचे पंजाबराव देसाई सांगितले. यावर बबन कांबळे यांनी आक्रमक होऊन थेट पाटण एसटी आगारात मोबाइलवरून संपर्क साधला. त्यावर आक्षेप घेत उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी सभा चालू असताना फोनवर बोलण्यास मनाई आहे. मोबाइल काढून घ्या असे सुनावले. कृषी विभागाच्या आढाव्यात कृषी अधिकारी मोरे यांनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी सुधारित नवीन शासन निर्णयानुसार शासनाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये रुपये दोन लाखांपर्यंत मदत मिळत असल्याचे सांगितले.

अतिवृष्टीमुळे 85 रस्त्यांचे नुकसान झाले आहे, नुकसान झालेल्या रस्त्यांचा व पुलांच्या दुरुस्तीसाठी आराखडा सादर करण्यात आला आहे. ढेबेवाडी विभागातील 7 कमी उंचीच्या पुलाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मंजूरी साठी पाठविण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची यादीनुसार पाहणी अधिकाऱ्यांकडून होत नाही, काही घरे पडलेल्या मिळकतीधारकांची नावे तपासणी यादीतच नसल्याचे सदस्य सुरेश पानस्कर यांनी निदर्शनास आणून दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.