कान्हे, – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात तसे गावागावात महात्मा गांधी तंटामुक्त समिती ही केवळ कागदावरच असल्याची दिसत आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये तंटामुक्त अध्यक्ष पदही रिक्त दिसत असून याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे या समितीत्या फक्त नावालाच उरलेल्या आहेत.
गावातील किरकोळ वाद, तंटे गावातच समन्वयाने मिटविण्याच्या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात केली होती. राज्य शासनकडून राबविण्यात येणारी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आता केवळ नावालाच राहिल्याचे चित्र आहे. सध्या या मोहिमेला हरताळ फासल्याचे दिसून येत असून गावपातळीवरचे तंटे थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे या समित्यांना अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
याअभियानामुळे गावागावातील तंटे कमी झाले होते तर गावामध्ये नेमलेल्या समित्याही जोमाने काम करीत होत्या. परंतु शासनाने या समित्यांकडे दुर्लक्ष केल्याने आता महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम तंटामुक्त समित्या फक्त पाट्या लावण्यापुरत्याच उरल्या आहेत. मावळ तालुक्यातील ग्रामीण भाग हा विकासाच्या वाटेवर आहे. भावभावकीत उद्भवणारे तंटे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावातचे समितीच्या माध्यमातून सोडवले जात होते. सामाजिक उपक्रम, लहान-मोठे तंटे, एकमेकांत झालेला वाद, शेतीचा वाद गावपातळीवर सोडविल्या जात होता. या मोहिमेत चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना रोख पारितोषिकदेखील दिले जात होते. परंतु सध्या ही मोहीम थंडावल्याने या मोहिमेच्या बळकटीकरणासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.
समितीच्या अध्यक्ष निवडीसाठीच तंटे
गावातील वाद सोडविण्यासाठी तंटामुक्त समिती नेमण्यावर भर दिल्या जात होता. गावातील छोटे-मोठे तंटे पोलीस ठाण्यात जाण्याअगोदरच मिटवले जावेत. तसेच गावपातळीवर एकोपा निर्माण होऊन जातीय सलोखा कायम ठेवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. परंतु त्यानंतर यामध्येही राजकारण शिरले. परिणामी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाच्या निवडीसाठीच गावात तंटे होत असल्याच्या अनेक घटना घडल्या. एकीकडे राज्य शासनाने या मोहिमेकडे केलेले दुर्लक्ष व दुसरीकडे स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत नसलेली उत्सुकता मोहिमेसाठी अडचणीची ठरली आहे.