टॅंकरचा आकडा 27 हजारांवर

जूनमध्ये विक्रमी मागणी : पाण्याचे नियोजन कोलमडल्याने उद्‌भवली स्थिती

पुणे – शहरात यावर्षी जून महिन्यात तब्बल 27 हजार 200 टॅंकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. जून महिन्यात लांबलेल्या पावसाने तसेच धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने याशिवाय, वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटनांसह, जलशुद्धीकरण केंद्रातील बिघाडाने ही स्थिती उद्‌भवली आहे. गेल्या 3 वर्षांत जून महिन्यात सरासरी 18 हजार फेऱ्या झालेल्या आहेत. मात्र, यंदा पहिल्यांदाच हा आकडा 27 हजारांवर वर गेला आहे.

शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडल्याने तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा खालावल्याने गेल्या सहा महिन्यांपासून शहरात महापालिकेकडून पाणीकपात सुरू आहे. त्यातच, शहरात वारंवार जलवाहिन्या फुटणे तसेच तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने मोठ्या प्रमाणात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या वर्षी मार्च 2019 पासूनच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने मार्च महिन्यात शहरात सुमारे 23 हजार 19 टॅंकर फेऱ्या झाल्या होत्या. तर एप्रिल महिन्यात हा आकडा 27 हजार 175 वर गेला होता. त्यानंतर मे महिन्यात हा आकडा पुन्हा दोन हजारांनी कमी होत 25 हजार 788 वर गेला होता. तर जून महिन्यात शहरात हा आकडा तब्बल 27 हजार 220 वर गेला आहे. यावर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला होता. त्यातच धरणाची पाणीपातळीही खालवल्याने शहरातील पाणीपुरवठा चांगलाच विस्कळीत झाला होता. परिणामी जून महिन्यात यंदाच्या वर्षातील विक्रमी टॅंकरच्या फेऱ्या झालेल्या आहेत.

गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक टॅंकर
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2016-17 मध्ये शहरात जून महिन्यात 18 हजार 933 फेऱ्या झाल्या होत्या. 2017-18 मध्ये 17 हजार 537 तर 2018-19 मध्ये 18 हजार 465 टॅंकर फेऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे जून महिन्यात कधीही टॅंकरची मागणी 20 हजार फेऱ्यांच्यावर गेली नव्हती. त्यामुळे यंदा उन्हाळयात ही मागणी तब्बल दहा हजार फेऱ्यांनी वाढली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)