वाकडमध्ये वाढू लागले टॅंकर

 • पाणी बचतीसाठी उपाययोजना
  -संपवेल तसेच इमारतीवरील टाक्‍यांमधून पाणी ओव्हरफ्लो होऊ देऊ नका.
  -घरातील नादुरूस्त नळ, फ्लॅश बंद आहेत, याची खात्री करा.
  -चांगल्या दर्जाचे नळजोड साहित्य वापरा.
  -सोसायट्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी शुद्धीकरण केंद्र आदी यंत्रणा उभाराव्या.
  -मोठ्या सोसायट्यांनी त्यांचे जलतरण तलाव बंद करावेत.
  -नळांना नोझल्स बसवावेत, त्यामुळे पाण्याचा वापर कमी होतो.

  पिंपरी – उच्चभ्रू सोसायट्यांचा परिसर अशी ओळख असलेल्या वाकड परिसराला सध्या पाणी टंचाईशी झुंजावे लागत आहे. या परिसरातील बहुतांश सोसायट्यांमध्ये महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे सोसायट्यांमध्ये दिवसाला 10 ते 12 टॅंकर मागवावे लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

  वाकड परिसर झपाट्याने विकसित होत आहे. त्या तुलनेत संबंधित परिसरात पुरेशा नागरी सुविधांचा अभाव आहे. वाकडमधील एका गृहप्रकल्पात सरासरी नऊ इमारती पकडल्यास संबंधित गृहप्रकल्पाला दोन ते अडीच लाख लिटर पाण्याची गरज भासते. त्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. त्यामुळे एका सोसायटीत दिवसाला 10 ते 12 टॅंकर तर कधी-कधी 15 टॅंकर पाणी मागवावे लागते. गेल्या दीड महिन्यांपासून ही स्थिती आहे.

  अनेक दिवसांपासून या परिसरासाठी वेगळी पाण्याची टाकी बनवण्याची मागणी होत आहे. त्यानुसार उपाययोजना सुरू केल्या असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु त्याचा वेग पाहता पाणी प्रश्‍न सुटण्यास आणखी दोन वर्षे लागण्याची शक्‍यता आहे. पाणी टंचाईची समस्या दिवसें-दिवस तीव्र होत असल्याने गैरसोयही वाढत आहे.

वाकड परिसरातील आमच्या सोसायटीत 312 सदनिका आहेत. त्यासाठी सरासरी 12 टॅंकर पाणी मागवावे लागते. सोसायटीतील बाग आणि फ्लॅशला आम्ही सोसायटीत उभारलेल्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्राचे पाणी वापरतो. सध्या महापालिकेकडून कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

– मयूर निघोजकर, प्रॉपर्टी मॅनेजर, कल्पतरु स्प्लेण्डर, वाकड

वाकड परिसरातील पाणी प्रश्‍न सुटावा यासाठी 25 लाख लिटर पाण्याची टाकी आणि 5 लाख लिटर संपवेल (जमिनीवरील पाण्याची टाकी) उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी प्राधिकरणाकडून 30 गुंठे जागा मिळाली आहे. या कामासाठी साडेपाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. सोसायट्यांनी सांडपाणी शुद्धीकरण केंद्र आणि पाण्याचा पुर्नवापर करणारी यंत्रणा उभारावी. पाणी जपून वापरावे.

– रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. त्यामुळे दररोज 10 ते 12 टॅंकर पाणी मागवावे लागते. पिण्यासाठी हे पाणी अशुद्ध असते. घरगुती फिल्टर बसवून पाणी शुद्ध करून घ्यावे लागते. त्यानंतरच ते पिण्यायोग्य होते.
– डी. एस. घिजी, ज्येष्ठ नागरिक, वाकड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.